विकासकामे संशयाच्या भोवऱ्यात; तृतीय पक्षामार्फत चौकशीची शिवसेनेची मागणी

Satara News : सातारा येथील गडकर आळीतील ग्रामदैवत श्री पेढ्याचा भैरोबा देवस्थान परिसरातील विकासकामांवरून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण कामाची तृतीय पक्षामार्फत स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातारा शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

परिसराचे नैसर्गिक स्वरूप आणि धार्मिक पावित्र्य अबाधित ठेवण्याऐवजी मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण करण्यात आल्याने कामाची गरज, आराखडा आणि दर्जाबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. देवस्थान परिसरातील पूर्वीच्या नैसर्गिक मुरमाच्या वाटा नागरिकांसाठी सोयीच्या होत्या. त्यावर काँक्रीटचा थर देण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल निवेदनात केला आहे. तसेच वॉकिंग ट्रॅक उभारण्यापूर्वी तांत्रिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता का? कामाचा आराखडा काय होता? त्याची गुणवत्ता तपासणी कोणी केली ? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

संशयास्पद हालचाली वाढल्या

पिढ्यानपिढ्या परिसराशी भावनिक आणि धार्मिक नाते असलेल्या स्थानिक रहिवाशांना विकासकाम सुरू करण्यापूर्वी विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासकामानंतर परिसरात रात्रीच्या वेळी अनधिकृत व संशयास्पद हालचाली वाढल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे देवस्थान परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

विकासकामाची स्वतंत्र चौकशी करून कामात अनियमितता किंवा दर्जात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास झालेल्या कामाची पुनर्तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी दत्तात्रय साळुंखे, सुभाष साळुंखे, ओंकार महांगडे, शिवेंद्र ताटे, बाबासाहेब सावंत, शरद कदम, विश्वास साळुंखे, उमेश साळुंखे, संतोष जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613