कोरोनाच्या जीवघेण्या संकटात भाववाढीचा कळस | 31.07.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |



गजानन चेणगे

सातारा : तमाम जनता कोरोनाच्या संकटाने ग्रासली असताना सगळीकडेच जीवनावश्यक वस्तुंच्या भाववाढीने कळस गाठला आहे. मायबाप सरकार कोरोनाशी लढण्यात गुंतले असताना नफेखोरी करत बहुतांश व्यापारी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करत आहेत. आधीच कोरोनाने मोडून पडलेल्या सामान्य माणसाची भाववाढीने 'मार डाला' अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कोरोना आपत्तीचे व्यवस्थापन पाहताना प्रशासनाने भाववाढीला लगाम घालण्यासाठी धाडसत्र सुरू करून नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखवावा, अशी मागणी केली जात आहे.  
कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग घायाळ झाले असून जगभरात व्यवहार ठप्प झाले आहेत. प्रत्येकाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या आपत्तीत जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. या कोरोनाच्या वरवंट्याखाली जगात साडेसहा लाखाहून अधिक लोकांचा जीव गेला असून आणखी प्रचंड जीवितहानीच्या धास्तीने लोक तणावाखाली एकेक दिवस ढकलत आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक सोडून एवूâणएक उद्योगव्यवसाय बंद पडले. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा हजारो लोकांच्या करूण कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. 
अशा संकटकाळात माणुसकीच्या नात्याने वागून संकटातील लोकांना शक्य तितकी मदत करणे अपेक्षित आहे. पण बहुतांश व्यापाऱ्यांकडून किराणा मालाला भरमसाठ दर लावून ग्राहकांची राजरोस लूट सुरू असल्याच्या तक्रारी संपूर्ण जिल्ह्यातून येत आहेत. जीवनावश्यक वस्तुंचा लोकांना व्यवस्थित पुरवठा व्हावा म्हणून शासनाने दुकाने खुली ठेवण्यास दिलेल्या परवानगीचा हा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे. किंबहुना ही एकप्रकारची विकृती आहे. 
कंटेनमेंट झोन नसलेल्या भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने विशिष्ट वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सोशन डिस्टन्सिंगचे पालन करून ही दुकाने चालवायची आहेत. त्याचप्रमाणे कोणीही भाववाढ करू नये. रास्त भावात लोकांना माल मिळावा. अन्यथा संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी परवानेही रद्द केले जातील असा सुका दम प्रशासनाने देऊन ठेवला आहे. परंतु कोरोनाच्या धुमश्चक्रीत या गोष्टींचे काटेकोरपणे पालन होते आहे की नाही याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाचे फावले आहे.
विशेषत: अनेक ठिकाणी किराणा मालाच्या दुकानात भरमसाठ दराने मालाची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे जास्त वेळ गर्दीत थांबावे लागू नये या सर्वसामान्य जनतेच्या मानसिकतेचा, त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत नफेखोरी केली जात आहे. ज्वारी, गहू, तांदूळ, गोडेतेल, शेंगदाणा, साखर, रवा, मैदा, पोहे, नारळ, डाळी यासारख्या जीवनावश्यक वस्तू मनमानी किमतीने विकल्या जात आहेत. ९० - १०० रूपये किलोचा शेंगदाणा १३० ते १४० रूपयांपर्यंत, गहू ३० च्या पुढे, ज्वारी ४० च्या पुढे, साखर ४० च्या पुढे, तुरडाळ १२० च्या पुढे, नारळ १५ चा २५ ला विकला जात आहे. हे दर वानगीदाखल दिले आहेत. इतकेच नव्हे, तर छापील किंमत (एमआरपी) असणारा मालही वाढीव दराने विकला जात आहे. 
सर्वत्र जीवनावश्यक मालाचा व्यवस्थित पुरवठा व्हावा म्हणून या मालाच्या वाहतुकीला शासनाने विशेष सवलत दिली असताना व्यापाऱ्यांकडून माल येत नसल्याचा कांगावा केला जात आहे. त्याआडून 'माल आज आहे, उद्या मिळेल की नाही हे सांगू शकत नाही, हवे असेल तर बोला' असे सांगत ग्राहकांना फसवले जात आहे. काही ठिकाणी तर किराणा मालाचा होलसेल व्यापार करणारे किरकोळ व्यापाऱ्यांना चढ्या दराने माल देत असल्याचे सांगितले जात आहे. दहा रूपयांचा पार्ले बिस्किट पुडा होलसेल व्यापारी दहाप्रमाणेच किरकोळ व्यापाऱ्यांच्या गळ्यात मारत असल्याने ते आणखी वाढवून लोकांना विकत आहेत.
बहुतेक ठिकाणी नफेखोरीसाठी व्यापाऱ्यांकडून साठेबाजी होत असल्याची चर्चा आहे. यातून बाजारात काही मालाचे शॉर्टेज असल्याचे भासवून ग्राहकांकडून मालाची अव्वाच्या सव्वा किंमत वसूल केली जात आहे. 'अडला नारायण धरी गाढवाचे पाय' या म्हणीप्रमाणे नाईलाजाने चढ्या भावाने माल खरेदी करण्याशिवाय ग्राहकांपुढे पर्याय रहात नाही. आधीच संकटाचा सामना करत असलेला ग्राहकराजा या लुबाडणुकीमुळे अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. कोरोनाचा मुकाबला करताना प्रशासनाचे या लुटमारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे लोकांचे मत झाले आहे. त्यामुळे आता आणखी सत्वपरीक्षा न पाहता प्रशासनाने भाववाढीला लगाम घालण्यासाठी जिल्ह्यात धाडसत्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दुकानदाराला दुकानापुढे दरफलक लावणे बंधनकारक केले पाहिजे. त्यापेक्षा जास्त दराने कोणी मालाची विक्री करत असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली पाहिजे. यावर लक्ष ठेवण्यासाठी तालुकानिहाय यंत्रणा उभी केली पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या