Satara News : मसूरच्या सशस्त्र दरोड्यातील आरोपी जेरबंद


जिल्हा पोलिसांची कामगिरी; पुसेसावळी, वडूजच्या दरोड्यांसह पाच गुन्ह्यांची कबुली

Satara News : सातारा जिल्ह्याला गेल्या काही दिवसात हादरवून सोडलेल्या मसूर, पुसेसावळी व वडूज येथील सशस्त्र दरोड्यातील आरोपींना जेरबंद करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वडूज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच वडूज पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही कारवाई फत्ते केली. संशयितांनी या दरोड्यांसह वडूज व दहिवडी येथील घरफोड्या मिळून पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

अविनाश उर्फ काल्या सुभाष भोसले (वय २४), अजय सुभाष भोसले (वय २२), सचिन सुभाष भोसले (वय २१, तिघेही राहणार महिजळगाव, ता. कर्जत, जि. नगर), राहुल उर्फ काल्या पदू भोसले (वय २८, रा. वाळुंज, पो. बाबुर्डी, ता. जि. नगर), होमराज उध्दव काळे (वय २५, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पुसेसावळीत पहिला दरोडा 

५ जानेवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास पुसेसावळी (ता. खटाव) येथे सशस्त्र दरोड्याने लोकांची झोप उडवली होती. ३० ते ३५ वयोगटातील ५ दरोडेखोरांनी हणमंतराव माने यांच्या घरात घुसून माने दांपत्यास लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी करुन मंगळसूत्र, मिनीमंगळसूत्र, अंगठी, चैन, कानातील फुले, बोरमाळ असे सोन्याचे दागिने व कपाटातील रोख रक्कम असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. याबाबत औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 

दरोड्याने मसूरकरांची उडाली झोप

त्यानंतर २ मार्च रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास मसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत संतोषीमाता नगर येथे डॉ. वारे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याने मसूर परिसरात खळबळ उडाली. या दरोड्यात फिर्यादी पूजा नितीराज वारे यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कड़ी तोडून ५ ते ६ अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे सासू-सासरे तसेच साक्षीदार यांना बांबूच्या दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले आणि फिर्यादी, फिर्यादीची सासू व साक्षीदार यांच्या अंगावरील तसेच कपाटातील मिनी गंठण, टॉप्स, सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, लहान चैन, बदाम, मोहनमाळ पैजण असे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्याच्या घटनेबाबत मसूरमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

वडूजच्या दरोड्याने तपासाला दिशा

तसेच ११ मार्च रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास वडूज (ता. खटाव) गावच्या हद्दीत खडकाचा मळा नावाच्या शिवारात फिर्यादी शिवाजी भिकू ननावरे हे त्यांच्या राहत्या घरात कुटुंबासह झोपले असताना ५ अनोळखी आरोपींनी त्यांच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांच्या पत्नीस लाकडी दांडक्यांनी मारहाण करुन त्यांना जखमी करुन फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र, कपाटातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या तिन्ही गुन्ह्यात आरोपींची गुन्ह्याची पध्दत एकसारखीच आढळल्याने त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू होता. दि. ११ मार्चच्या वडूज येथील दरोड्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, वडूज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच वडूज पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता पोलिसांना घटनास्थळावरील तसेच परिसरातील लोकांकडून आरोपींच्या वर्णनाबाबत महत्वाची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने संशयित आरापींबाबत माहिती घेतली असता आरोपी नगर जिल्ह्यातील कर्जत तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मालोजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाने दि. १४ मार्च रोजी कर्जत तसेच आष्टी येथे जावून संशयित आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती घेऊन माहिजळगाव (ता. कर्जत) येथून ५ संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. तपास पथकाने आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी वडूज, पुसेसावळी तसेच मसूर येथील दरोड्याच्या गुन्ह्यांसह वडूज व दहिवडी येथील प्रत्येकी १ घरफोडी अशा एकूण ५ गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून याच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या