Satara News : अखेर ठरलं... राज्यमार्ग जाणार पुसेगावातूनच


पोलीस ठाण्यापर्यंतचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा झाला निर्णय

Satara News : सातारा ते लातूर राज्यमार्ग पुसेगावातून जाणार, की गावाबाहेरून रिंगरोड होणार हा बराच काळ भिजत पडलेला प्रश्न शेवटी निर्णयाप्रत आला आहे. हा महामार्ग पुसेगावातूनच जाईल यावर एकमत झाले आहे.

पुसेगाव ही खटाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून सेवागिरी देवस्थानमुळे संपूर्ण राज्यात हे तीर्थक्षेत्र प्रसिध्द आहे. गावातून जाणार्‍या राज्य मार्गाच्या रूंदीकरणाचे काम वादामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. यासंदर्भात सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात पुसेगाव ग्रामपंचायत, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे प्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच ठेकेदार कंपनीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीस देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, सरपंच विजय मसणे, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, सुरेशशेठ जाधव आदी उपस्थित होते.

प्रत्यक्ष कामाला सोमवारचा मुहूर्त

या बैठकीत गावातील रस्त्याचे पोलीस स्टेशनपर्यंतचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. तसेच पब्लिक स्कूलपासून पोलीस स्टेशनपर्यंत ९ मीटर रूंदीचा कॉंक्रिट रोड, दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड मीटर रुंदीची आरसीसी गटर्स बांधण्याचेही ठरविण्यात आले. त्यासाठी गावच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आणि व्हॉल्व यंत्रणाही बदलण्यात येणार आहे. काही ठिकाणचे विद्युत पोलही हलविण्यात येणार आहेत. सोमवारी महावितरण, पाणीपुरवठा अधिकारी, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची बैठक होवून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

पोलीस स्टेशनपासून सेवागिरी मंदिरापर्यंतचा पाचशे मीटरचा भाग जुन्या गावठाणात येतो. मोजणी करुन त्या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाकडून अधिग्रहणाचा मोबदला मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. 

या मार्गावरून प्रवास करणार्‍या हजारो वाहनधारकांना कित्येक दिवसांपासून खराब रस्ता, खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. गावातून जाणार्‍या रस्त्याबद्दल विविध शक्यता वर्तविण्यात येत होत्या. रिंगरोड होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. काहीही झाले तरी गावच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टने हालचाली गतिमान केल्या आहेत. 

काम त्वरेने पूर्ण होण्यासाठी सहकार्य करा

पुसेगावातून जाणार्‍या रस्त्याच्या रूंदीकरणाबाबत काही ठिकाणी अडचणी आहेत. लोकप्रतिनिधींना या कामात काही मर्यादा पडतात. अशा वेळी संबंधित अधिकार्‍यांनी त्यांचे अधिकार वापरुन मार्ग काढायची गरज आहे. रस्त्याच्या कामामुळे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे, मात्र ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल. रस्त्याचे काम त्वरित व्हावे म्हणून पुसेगावकरांनी सहकार्य करावे.

 - डॉ. सुरेश जाधव

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या