गजानन चेणगे
सातारा : कोरोनाच्या महामारीच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वस्तू, सेवा व पैशाची साखळी खंडित झाल्याने बँकिंग व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. यावर उपाययोजना म्हणून रिझव्र्ह बँकेने रेपो दरात वेळोवेळी कपात केली आहे. सातारा जिल्हा बँकेनेही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील महिला बचत गट, शेतकरी मंडळे, नोकरदार पतसंस्था, पाणी पुरवठा संस्था, ग्राहक संघ, खरेदी विक्री संघ, विकास सेवा संस्था, सहकारी साखर कारखाने, सोने तारण कर्ज अशा सर्व घटकांना कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याच पाश्र्वभूमीवर बँक एम्प्लॉईज युनियन, कोल्हापूरचे अध्यक्ष अतुल दिघे, उपाध्यक्ष अविनाश खलाटे, जिल्हा समन्वयक जितेंद्र चौधरी व अभिजित देशमुख यांनी बँकेच्या सेवकांच्या कर्जाच्या व्याज दरात कपात करण्यासाठीही पाठपुरावा केला. याला प्रतिसाद म्हणून बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, संचालक व राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर यांनीही सेवकांच्या कर्जावरील व्याज दर कमी करण्याबाबत सहमती दर्शवली व तसा निर्णय बँकेच्या संचालक मंडळामध्ये घेण्यात आला.
आजच्या बदलत्या बँकिंग कामकाजामध्ये सेवकांनी प्रभावी काम करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकांना तत्पर, आपुलकीची व नम्रतेची सेवा दिली पाहिजे. त्याच बरोबर बँकेच्या विविध कर्जयोजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी यावेळी केले.

0 टिप्पण्या