सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाने लोकांच्या अडचणी आणि जनभावनांचा विचार करुन कुठेही हेल्मेट सक्ती करु नये तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तशा स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी विनंती सातारा - जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर दुचाकीवर दोन लोकांना प्रशासनाने परवानगी दिली. मात्र त्याचबरोबर दुचाकी चालकास हेल्मेट सक्ती लागू केली. वास्तविक हेल्मेट घातले म्हणून कोरोनापासून बचाव होईल किंवा कोरोना होणार नाही असे काही नाही. कोरोनापासून बचावासाठी मास्कची सक्ती आवश्यक आहे, पण हेल्मेट सक्ती चुकीची आहे. ज्यांना स्वेच्छेने हेल्मेट वापरायचे असेल त्यांना वापरु द्या. कोल्हापूर, सांगली, पुणे यासह महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात हेल्मेट सक्ती नाही. पुण्यासारख्या शहरात हेल्मेट सक्ती होवू शकली नाही. हेल्मेट सक्तीच्या विरोधात वारंवार जनआंदोलने झाली आहेत आणि प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. मात्र सातारा जिल्हा प्रशासनाने अचानक हेल्मेट सक्तीचा निर्णय का घेतला हे अनाकलनीय आहे, असे आमदार शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

0 टिप्पण्या