आता सातारा जिल्ह्यात गृह विलगीकरण सुरू होणार; नियमावली जारी | 03.08.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |


सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधितांमध्ये अधिकाधिक नागरिक सौम्य लक्षणे असलेले आहेत. अशा नागरिकांना इथून पुढे नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोय उपलब्ध असेल तर घरीच वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिशय सूक्ष्म नियमावली करण्यात आली आहे. कोरोनाचे ८० टक्के रूग्ण घरी राहूनच सहज बरे होऊ शकतात. त्यादृष्टीने होम आयसोलेशन महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला आहे.
तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणाचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तर घाबरून जावू नका. ८० टक्क्यांहून जास्त कोरोना रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे दिसतात. असे रूग्ण घरच्या वातावरणात राहून बरे होऊ शकतात. यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली एक आदर्श नियमावली ठरेल. याचा अतिशय चांगला परिणाम होईल. जनतेनेही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले आहे.
ही नियमावली तयार करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह साताऱ्यातील व्यावसायिक माजीद कच्छी आणि त्यांच्या टीमने सामाजिक बांधिलकीतून योगदान दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. 

होम आयसोलेशनच्या पायऱ्या
पायरी १ : आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक तुमच्या घराला भेट देईल. ते तुमच्या तब्बेतीचे निकष आणि तुमच्या निवासाची परिस्थिती पाहील आणि तुम्हाला होम आयसोलेशनमध्ये ठेवता येईल का याबद्दल माहिती देईल.
 
पायरी २ : तुम्ही होम आयसोलेशनसाठी सक्षम आहात असे दिसल्यास तुम्हाला आरोग्य विभागाकडून होम आयसोलेशनच्या प्रशिक्षणासाठी एक दूरध्वनी येईल. ते तुम्हाला होम आयसोलेशनच्या सर्वोत्तम पध्दतीचे प्रशिक्षण देतील. पुढील १० दिवस तुमच्या तब्बेतीची देखरेख करण्यासाठी तुम्हाला दररोज दूरध्वनी येईल.

पायरी ३ : रूग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर १० दिवसांनी व आयसोलेशनच्या शेवटच्या ३ दिवसांमध्ये ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे दिसत नसल्यास रूग्ण होम आयसोलेशन संपवू शकतो. कोणतीही लक्षणे दिसत नसतील, तर १० दिवसांनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून किंवा कॉल सेंटरकडून तुम्हाला होम आयसोलेशन समाप्त करण्याबद्दल दूरध्वनी येईल. रूग्णाने त्यानंतर ७ दिवस घरातच राहून स्वत:च्या तब्बेतीवर देखरेख ठेवावी, असा सल्ला आहे. होम आयसोलेशनचा काळ संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Very good effort to get good advice to public about covid infection and home isolation of the patient having mild symptoms and good
    administration by the district authorities with the help of health department

    उत्तर द्याहटवा