वाळवा : शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेला सुखी करण्याचा मंत्र क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्याला दिला आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर केलेल्या त्यागाची आठवण आपण सर्वांनी ठेवूया, असे प्रतिपादन हुतात्मा शिक्षण उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यात वाळवा येथे हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावरील क्रांतिसिंहांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वैभवकाका नायकवडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजी अहीर, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्याताई चेंडके, पर्यवेक्षक एस खणदाळे, सर्व शिक्षक आणि शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
वैभवकाका नायकवडी म्हणाले, वाळवा गाव ही क्रांतिसिंह नाना पाटील यांची खरी कर्मभूमी होती. त्यांनी इथे रुजवलेला विचार आजही पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने जपला जात आहे. वाळवा गाव ब्रिटिशांच्या लढ्यामध्ये सर्वात अग्रभागी होते. नाना पाटील यांचे वास्तव्यदेखील वाळवा गावात अखेरपर्यंत होते, त्यांच्यावर अंत्यसंस्कारदेखील वाळवा येथे करण्यात आले. त्यामुळे वाळव्याची भूमी नव्या पिढीला सतत प्रेरणा देत आहे, या भूमीमध्ये अनेक चळवळी उभ्या राहिल्या. साहित्य, क्रीडा क्षेत्र असो अथवा सहकार, चळवळींच्या क्षेत्रात कायम वाळवा गावाचे नाव सतत उंचच राहिलेले आहे.
दरम्यान, हुतात्मा साखर कारखाना येथील अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख, प्रसिद्धी अधिकारी शिवाजी पाटील, विजय मुसळे - पवार, कामगार अधिकारी ए. डी. माळी, साखर विभागाचे रामचंद्र कदम, संगणक विभागाचे एस. ए. पाटील, शेती अधिकारी ए. पी. चव्हाण, पोपट कदम आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या