मसूर ग्रामपंचायत इमारतीसाठी दिमाखात भूमिपूजन | 08.08.20 | Today's Marathi Live News in Satara, Maharashtra |


मसूर : कराड तालुक्यातील मसूर येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखदार सोहळ्याने करण्यात आले. नवी वास्तू वर्षभरात पूर्ण होऊन मसूरकरांच्या सेवेत दाखल होईल आणि ही भव्य वास्तू मसूरसाठी वैभवशाली ठरेल, असे गौरवोद्गार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याप्रसंगी काढले.

प्रामुख्याने जिल्हा ग्रामीण विकास निधीच्या सहाय्यातून मसूर ग्रामपंचायत इमारतीचे हे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जुनी वास्तू उतरण्यात आली असून त्या जागी नवी तीन मजली प्रशस्त व आकर्षक इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठीचा भूमिपूजन सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शनिवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रांत उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, भारती मिणियार यांच्यासह मसूर येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुनी इमारत मसूरच्या इतिहासाची साक्षीदार होती. परंतु काळाची गरज म्हणून प्रशस्त व सुसज्ज इमारत होणे गरजेचे होते. गेले अनेक दिवस मानसिंगराव जगदाळे यांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. आता त्या कामाला मूर्त स्वरूप येत असून कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या कामासाठी शासकीय निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल, असे प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी महात्मा गांधी यांनी गवालिया टँकवरून ‘करेंगे या मरेंगे’ चा नारा दिला होता. त्याच ऐतिहासिक दिवशी मसूर ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन होत आहे हा चांगला संकेत आहे. या चावडीतून आवडीचा कारभार चालावा अशा शुभेच्छा खासदार श्रीनिवास पाटील यांनी याप्रसंगी दिल्या.

या इमारतीचे काम १९८९ सालीच हाती घ्यायचे होते. पण त्यावेळी ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा मार्ग सुरू व्हावा म्हणून शॉपिंग सेंटर केले. त्या कर्जातून बाहेर आल्यावर आता हे काम हाती घेतले आहे, असे मानसिंगराव जगदाळे यांनी यावेळी सांगितले. नवीन इमारतीत सरपंच, ग्रामविकास अधिकारी दालन, मिटिंग हॉल, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. शिवाय तलाठी, मंडल अधिकारी, कृषी विभाग यांची कार्यालयेही असणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मानसिंगराव जगदाळे यांची काम करण्याची पध्दत आपण जवळून पाहिली आहे. त्यांनी ग्रामपंचायत इमारतीसाठी आग्रहाने पाठपुरावा केला आहे. या ग्रामपंचायतीचे कामकाज जिल्ह्याला दिशा देणारे ठरावे, अशी अपेक्षा प्रदीप विधाते यांनी व्यक्त केली. 

यावेळी मंगेश धुमाळ, नंदकुमार जगदाळे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक व स्वागत सरपंच पंकज दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले, तर निलोफर मोमीन यांनी आभारप्रदर्शन केले.

मसूरला ग्रामीण रूग्णालय व्हावे

मसूर ही जवळपास पंचवीस गावांची प्रमुख बाजारपेठ असून या परिसराची गरज म्हणून मसूरला ग्रामीण रूग्णालय व्हावे अशी मागणी नंदकुमार जगदाळे यांनी यावेळी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी उचलून धरली. रविवारी (दि. ९) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे कराडला येत आहेत. त्यावेळी आपण ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवुया, पालकमंत्र्यांसह आपण त्यांच्याकडे आग्रह धरूया अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यादृष्टीने माहिती तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांना यावेळी दिल्या.


पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या