सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर | 09.08.20 | Today's Marathi Live News on Corona in Satara, Maharashtra |


सातारा : सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत असून या दोन्ही जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविले पाहिजे. तसेच प्रत्येक कोरोना रुग्णामागे कमीत कमी १५ निकट सहवासितांची टेस्ट केली पाहिजे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येईल. तसेच या जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा, अशा सूचना आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे यांनी केल्या. येत्या एक - दोन दिवसात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात रविवारी टोपे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, हातकणंगलेचे आमदार राजू आवळे, कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.
कोरोना टेस्टिंगच्या अहवालाला २ ते ३ दिवस लागत असल्यामुळे बाधितावर उपचार करण्यास उशीर होत आहे. संबंधिताचा नमुना घेतल्यानंतर त्याचा अहवाल हा २४ तासात प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे संबंधितावर वेळेत उपचार करता येतील. राज्य शासन येत्या काही दिवसात ५०० रुग्णवाहिका खरेदी करणार असून त्यांचे वाटप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांना करण्यात येणार आहे. बऱ्याच रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याने उपचार करण्यास उशीर होत आहे. तरी सातारा व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णवाहिका अधिगृहित कराव्यात, असे टोपे यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयांमध्ये फिजिशियनची कमतरता असून खासगी रूग्णालयांच्या फिजिशियनची सेवा कोरोना रुग्णांसाठी घ्यावी. त्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून ६ ते ७ दिवस कोविड रुग्णालयांमध्ये काम करावे, असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ४५ रुग्णालये व सातारा जिल्ह्यातील २७ रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गावर सर्वांसाठी मोफत उपचार केले जात आहेत. कुठले रुग्णालय पैसे घेत असल्यास त्या रुग्णालयावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी.
काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय विभागांमधील ऑडीटरची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत देयक तपासणी करुन ते संबंधित रुग्णाला देण्यात यावे. तसेच भरारी पथकाचीही नेमणूक करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असून त्यांनी ज्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात. इतर आजारांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना उपचार करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. अशा रुग्णालयांवर जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी, अशा कडक सूचनाही त्यांनी केल्या. कोरोना संदर्भात उपाययोजना राबविण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने येत्या एक-दोन दिवसात मुंबई बैठक घेऊन निधी उपलब्ध करुन द्यावा, असे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

कारखान्यांनी रूग्णालये उभारावीत : पवार

कोरोनाचे संकट हे अख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एक छोटेसे अद्ययावत रुग्णालयाची निर्मिती करुन ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाNयांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला देश, राज्य नक्की कोरोना मुक्त होईल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला.
यावेळी रामराजे नाईक - निंबाळकर, मंत्री हसन मुश्रिफ, शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, दीपक चव्हाण यांनी उपयुक्त सूचना केल्या. प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या