कोयना – कृष्णाकाठाला धडकी, धरणाचे दरवाजे 10 फुटांनी उघडले | Latest Marathi News

 

55
हजार क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु

मूळगाव, संगमनगर धक्का जुना पूल, निसरे फरशी पाण्याखाली

पाटण : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयात प्रतिसेकंद 67 हजार 696 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी झाला असून पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित 10 फुटाने उचलून कोयनानदी पात्रात  प्रतिसेकंद 54 हजार 246 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल साडे सहा टीएमसी इतक्या विक्रमी पाण्याची आवक झाली असल्याने रविवारी सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 90 टीएमसी झाला होता. धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा वीज गृहातून 2 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग शुक्रवारपासून सुरु करण्यात आला होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्याने आणि भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आणि कोयना धरणाच्या पाणी पातळीची निर्धारित लेव्हल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना जलसिंचन विभागाने घेतला आणि त्यानुसार शनिवार दि. 14 रोजी दुपारी 2 वाजून 1 मिनिटांनी धरणाचे सहा वक्र दरवाजे 1.9 फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 11 हजार 427 क्युसेक वेगाने कोयना पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने रविवारी सकाळी 8.30 वाजता पुन्हा सहा वक्र दरवाजे 4 फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात 25 हजार 604 क्युसेकस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

दरम्यान, सकाळी 8 वाजल्यापासून धरणाच्या पायथा वीज गृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच पुन्हा धरणाच्या सहा वक्र दरवाजे 6 फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 33 हजार 732 क्यूसेक्स आणि पायथा वीज गृहातून 2 हजार 100 क्युसेक असे मिळून एकूण कोयना नदीपात्रात तब्बल 35 हजार 622 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तरीही पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे रविवारी दुपारी 2 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी एक फूट उचलून 7 फूटावर उचलण्यात आले. मात्र त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सायंकाळी 4 वाजता धरणाचे दरवाजे उचलून प्रतिसेकंद 52 हजार 146 क्यूसेकस आणि पायथा विजगृहातून 2 हजार 100 क्यूसेक्स असे एकूण 54 हजार 246 क्यूसेक्स वेगाने कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोयना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा मुळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना नदीला महापुराचे स्वरूप आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगर येथे 282 मिलीमीटर, नवजा येथे 324  मिलीमीटर, तर महाबळेश्वर येथे 203 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत  धरणात प्रतिसेकंद 59 हजार 258 क्युसेक इतक्या प्रचंड पाण्याची आवक सुरु होती. धरणाची पाणीपातळी 2152.6 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी इतका झाला आहे. तसेच चेरापुंजीनंतर सर्वात जास्त पावसाची नोंद होत असलेल्या पाटण तालुक्यातील दुर्गव डोंगराळ परिसरात असणाऱ्या पाथरपुंज येथे पावसाने 4 हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. येथे 27 (4639) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पश्चिम घाटातील पर्जन्यक्षेत्रातही पर्जन्यवृष्टी सुरूच असून प्रतापगड येथे 40 (3364), सोनाट 20 (2766), बामणोली 39 (2381), वळवण 35 (4411) काठी 61 (2381) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम होता.

असे पोहचणार पाणी..!

कोयना धरणातून विसर्ग झाल्यानंतर पुराचे पाणी पाटणला 6 ते 8  तासांनी पोहचते. कराडला 16 ते 18 तासांनी तर सांगलीला 28 ते 30  तासांनी पोहचते. त्यामुळे 2 वाजता कोयना धरणातून सोडलेले पाणी पाटणला रात्री 7 ते 9 वाजेपर्यत, कराडला सोमवारी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत तर सांगलीला मंगळवारी रात्री सकाळी 9 वाजता पोहचू शकते.

पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

कोयना पाणलोट क्षेत्रासहित संपूर्ण पाटण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पर्जयवृष्टी सुरू असून कोयना धरणातील विसर्गामुळे कोयना नदीला महापुराचे स्वरूप आले आहे.परिणामी नदीकाठच्या पाटण,मंद्रुळ हवेली ,नावडी या गावांतील शेतात पाणी शिरले असून मुळगाव पुलावर पाणी आल्यामुळे नदीपलीकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. परिणामी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटणमध्ये सद्या स्मशानभूमीला पाणी लागले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पाटण शहरासहित अनेक गावांना धोका  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या