कोरोनामुळे स्वातंत्र्यदिनी जिलेबीच्या आनंदावर ‘विरजण’ |11.08.20 | Today's Marathi live news on Corona in Satara, Maharashtra |


सातारा : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हटलं की प्रत्येकाला हमखास जिलेबी आठवते. तसा जिलेबीचा आणि या राष्ट्रीय सणांचा अर्थाअर्थी संबंध काय असा प्रश्न पडू शकतो. पण कित्येक वर्षांपासून हा प्रघात पडला आहे हे नक्की. या दिवशी सर्वत्र जिलेबीचे स्टॉल सजलेले दिसतात. घरोघरी हौसेने जिलेबी नेली जाते. सार्वजनिक कार्यक्रमातही अनेकदा जिलेबीचा आस्वाद घेतला जाताना दिसतो. जिलेबीचे विरजण चांगले लागल्याशिवाय जिलेबी चांगली होत नाही असं म्हणतात, पण यावेळी सातारा जिल्ह्यात जिलेबीच्या आनंदावरच ‘विरजण’ पडणार आहे. कारण स्वातंत्र्य दिनी जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती ठिकाणी जिलेबी व मिठाईचे उत्पादन, विक्री व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वत्र मिठाईचे, खासकरुन जिलेबीचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दक्षता घेण्यात आली आहे. कोरोनाचा फटका जिलेबीला, जिलेबी व्यावसायिकांना तसेच जिलेबीची चव चाखू इच्छिणाऱ्या सर्वांनाच बसला आहे. यामुळे बहुतेकांना जिलेबीपासून वंचित रहावे लागणार आहे.


पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या