मुन्नाभाईच्या चाहत्यांना मोठा धक्का; कर्करोगाचे निदान | Sanjay Dutt's News | Today's Bollywood News in Maharashtra, India |



मुंबई : ‘मुन्नाभाई’ संजय दत्तची प्रकृती बिघडली असून फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असून लवकरच तो यासंबंधीच्या उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्याला शनिवारी तातडीने मुंबईच्या लीलावती रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. यासंबंधीची माहिती स्वत: संजय दत्तने सोशल मीडियावरून दिली. मंगळवारी त्याने इन्स्टाग्राम तसेच ट्विटरवर आपल्या आरोग्याविषयी पोस्ट अपलोड केल्याने त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 

आपण वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने काही काळ आपल्या कामात स्वल्पविराम घेत असल्याचे मुन्नाभाईने जाहीर केले आहे. कुटुंबीय आणि मित्र आपल्यासोबत असून चिंता करू नका व अनावश्यक विपर्यास करू नका अशी चाहत्यांना विनंती आहे. तुमचे प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परत येईन असे त्याने म्हटले आहे. संजय दत्तची पत्नी आणि दोन मुले दुबईत अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना इकडे येता आलेले नाही. तसेच त्याची भूमिका असलेल्या सडक २, समशेरा, भुज, केजीएफ आदी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कोरोनामुळे लटकले आहे.

दरम्यान, संजयची पत्नी अभिनेत्री मान्यता दत्त यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. संजय नेहमीच योध्यासारखा वाटचाल करत आला असून मोठमोठ्या संकटांनाही त्याने हरवले आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीच्या संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.



आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या