सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थेची यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची भपकेबाजी नसावी. कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजित करण्यास सक्त मनाई आहे.
यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागण्यास मनाई असेल. नागरिक आकर्षित होऊन गर्दी होवू नये याकरिता कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शनास मनाई करण्यात आली आहे.
सांस्कृतिक / गर्दीचे कार्यक्रमांऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्य विषयक उपक्रम / शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.
श्री गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्वâ, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सक्त मनाई असून कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना कंटेनमेंट झोनच्या बाहेरील गणेशोत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. तसेच उक्त कालावधीत गणपती मंडळांनी त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता, आरोग्य सेतू अॅप इत्यादीबाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे बंधनकारक आहे, जेणेकरुन यदाकदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे होईल.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या