सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फलटण - शिंगणापूर रोडवर शुक्रवारी चोरीचे सोने विकण्यास आलेल्या एकास अटक केली असून त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचे ६ तोळे सोने जप्त केले आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघड झाले आहेत. विठ्ठल उर्फ मेजर शिवाजी पवार (रा. कोळकी, ता. फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फलटणमध्ये चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार साबळे यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २१) फलटण - शिंगणापूर रोडवर सापळा रचला.
यावेळी विठ्ठल उर्फ मेजर शिवाजी पवार यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. त्यामुळे त्याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६ तोळे सोने आढळून आले. त्याने वर्षभरापूर्वी इंदापूर, (जि. पुणे) येथे महिलेच्या गळ्यातील सोने चोरून आणल्याचे सांगितले. याचबरोबर त्याने सस्तेवाडी (ता. फलटण) येथून डीव्हीडी प्लेअर चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, संजय जाधव, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या

0 टिप्पण्या