जेईई व नीट परीक्षा घेण्याच्या अट्टाहासाविरोधात साताऱ्यात काँग्रेस रस्त्यावर | Latest Marathi News



सातारा : कोरोना महामारीच्या संकटातही जेईई व नीट परीक्षा घेण्याचा अट्टाहास केंद्र सरकार करत असल्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. यावेळी यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात आले. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

जेईई व नीट परीक्षांबाबत गेले काही दिवस देशभर उलटसुलट चर्चा सुरु असून केंद्र सरकार परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी आणि पालक आंदोलन करीत असूनही केंद्र सरकार आडमुठी भूमिका सोडण्यास तयार नसल्याची टीका चहुबाजुंनी होत आहे. कोरोनाचे संकट घोंगावत असताना या परीक्षा घेण्याच्या हेकेखोरपणामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षेला बसण्यास भाग पाडल्यास कोविड-१९ च्या संसर्गामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मोठी विद्यार्थी संख्या लक्षात घेता परीक्षा केंद्रावर योग्य सामाजिक अंतर ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे संसर्गाची शक्यता वाढेल तसेच परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नाही. कारण अजूनही बहूतांश सार्वजनिक सुविधा बंद आहेत आणि हॉटेल व लॉज बंद असल्यामुळे लांबून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर होईल. या सर्व असुविधांचा व असुरक्षितेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर होऊन ताणतणावाखाली त्याची गुणवत्ता खालावण्याचाही धोका आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारने जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी देशातील सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेल्या आभासी बैठकीवेळी केली आहे. देशभरातील विद्यार्थी, पालक, विरोधी पक्ष व विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी या परीक्षेबाबत केलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाला ठोस विरोध करण्यासाठी आज सातारा जिल्हा काँग्रेसतर्फे कोविड -१९ च्या पाश्र्वभूमीवर सामाजिक अंतर नियमाचे पालन करीत मोजक्या कार्यकत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व केंद्र सरकारला जिल्हाधिकारी यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाबासाहेब कदम, बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार, मानाजी घाडगे, शिवराज मोरे, विराज शिंदे, धनश्री महाडिक, नरेश देसाई, एम. के. भोसले, हरिभाऊ लोखंडे, अ‍ॅड. धनावडे, बाळासाहेब शिरसाट, मनोज तपासे, अशोकराव गोडसे, आनंदराव जाधव, धैर्यशील सुपले, विक्रांत चव्हाण, रिझवान शेख, अभय कारंडे, नंदाभाऊ जाधव, सादिक अन्वर खान आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या