केवळ दाखवायला उघडी, पण सेवेच्या नावाने ओरड
मसूर : कराड तालुक्यातील मसूर येथील कराड अर्बन बँकेचे एटीएम वगळता अन्य एटीएम सेंटर्स सध्या केवळ शोपीस झाली आहेत. ही एटीएम सेंटर्स केवळ दाखवायला उघडी, पण सेवा बंद असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी असून तिथे ‘खोळंबा’ होऊनही ‘गुळांबा’ मिळत नसल्याने लोक अक्षरश: वैतागले आहेत.
मसूर ही कराड तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असून येथे मल्हारपेठ - पंढरपूर व खंडाळा - शिरोळ या दोन राज्य महामार्गांचा चौक आहे. त्यामुळे येथे वाहनांची मोठी आवकजावक असते. तसेच आजुबाजुच्या वीस - पंचवीस गावचे लोकही येथेच खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे लोकांची एटीएमची गरज मोठी आहे. मसूरला कराड अर्बन बँक, अॅक्सिस बँक, आयडीबीआय बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांची एटीएम आहेत. तथापि, यापैकी केवळ कराड अर्बन बँकेचे एटीएम अव्याहतपणे सुरू असून बाकी एटीएमची अवस्था म्हणजेच ‘दुरावस्था’ अशी आहे. ही एटीएम उघडी असतात, पण कधी सर्व्हर डाऊन तर कधी मशिन नादुरूस्त असल्याने लोकांना पैसे काढता येत नाहीत. पैसे काढण्यासाठी ग्राहक तिन्ही ठिकाणी जावून धडकतात, परंतु तेथे हाच अनुभव येतो. मग ग्राहक कराड अर्बन बँकेच्या एटीएमकडे धाव घेतात. त्यामुळे त्या एकाच ठिकाणी एटीएमला गर्दी होते. जे आजच्या काळात चांगले नाही. शिवाय गर्दीमुळे लोकांना नंबर येण्यास वेळ लागतो.
आयडीबीआय व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या शाखा मसूरमध्ये आहेत. कोरोनाच्या काळातही या शाखांमध्ये ग्राहकांच्या रांगा पहायला मिळतात. त्यामुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एटीएमशिवाय पर्याय रहात नाही. पण त्या एटीएमचीच नेहमी ओरड असल्याने लोकांना त्यांचा कवडीचाही उपयोग होत नाही. शिवाय या शाखांचेही त्यांच्या एटीएमकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या एटीएम सेंटरलाच रया नसल्याचे पहायला मिळते. तेथील मशिनची देखभाल होताना दिसत नाही. सुरक्षा रक्षकही नसतो. एटीएम दिसते म्हणून ग्राहक त्या ठिकाणी थबकतो. आत जावून पाहतो तर मशिन चालत नाही. त्याचा वेळ वाया जातो. जर ही सेवा ग्राहकांना मिळणार नसेल, तर ती सुरू तरी कशासाठी ठेवता असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.

0 टिप्पण्या