सातारा : पश्चिम महाराष्ट्रावर गतवर्षी ओढवलेले अभूतपूर्व महापुराचे संकट, यंदा कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला प्रतिकूूल परिणाम आणि त्याचा परिपाक म्हणून शेती व्यवसायावर झालेला अनिष्ट परिणाम अशा परिस्थितीतदेखील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या आवाहनास आणि विकास सेवा संस्था, पंच कमिटी, सचिव व बँकेच्या वसुली यंत्रणेच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने प्रामाणिकपणे पीक कर्जाची वेळेत परतफेड केली. त्यामुळे बँकेने आपली परंपरा कायम राखत यावर्षीही शेतीकर्जाची ९७ टक्के वसुली करून राज्यात विक्रम केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
याबाबत बँकेने दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध असलेली जिल्हा बँक ३२० शाखा व ९५३ विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना निरंतर बँकिंग सुविधा पुरवित आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी-औद्योगिकीकरणाचे धोरण गतिमान करण्यासाठी बँकेने विविध योजना राबविल्या आहेत. वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी ही एकमेव बँक आहे. जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२० - २१ साठी एकूण पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट २२०० कोटी रुपये आहे. त्यापैकी जिल्हा बँकेचे उद्दिष्ट १३०० कोटी रुपयांचे आहे. खरीप पिकासाठी ९५० कोटी निश्चित केले असून २ लाख २६ हजार ७१३ शेतकरी सभासदांना १२७८ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. उद्दिष्टाची १३४ टक्के पूर्तता करून बँकेने उल्लेखनीय काम केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रिझव्र्ह बँकेच्या निर्णयानुसार पीक कर्ज परतफेडीस यंदा दि. ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अद्याप पीककर्जाची परतफेड करू न शकल्याने नवीन पीककर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकरी सभासदांनी या मुदतीवाढीचा फायदा घेऊन कर्जफेड करावी. त्यातून शासनाच्या व्याज परतावा व इतर योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.
आजच्या ताज्या बातम्या - https://satarAaAupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या