धरणातून २७ हजार ४९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग
सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा सुरूवात केली असून धरणात प्रतिसेकंद ३६ हजार ६५९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या ९४.६२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसाचे कमी-अधिक प्रमाण पाहता धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण राखण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज ४ फुट उचलण्यात आले असून धरणातून २७ हजार ४९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा कोयना, केरासह इतर नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
गेल्या आठवडाभर पाटणसह कोयना पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पर्जन्यवृष्टी सुरू होती. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक जवळपास दीड लाख क्युसेकपर्यंत गेली होती. त्यामुळे धरणाचे दरवाजे १० फुटांपर्यंत उचलून ६५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला होता. तद्नंतर दोन ते तीन दिवसांनी पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याची आवकही घटली होती. त्यामुळे धरणाचे दरवाजे टप्याटप्प्याने बंद करण्यात आले. केवळ पायथा वीजगृहातूनच वीजनिर्मितीनंतर २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात सुरू होता. मात्र गुरूवारी (दि. २०) मध्यरात्रीपासून पुन्हा धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने शिवाजीसागर जलाशयात पाण्याची आवक तब्बल ६१ हजार ३६१ क्युसेक्स प्रतिसेकंदपर्यंत गेली होती. धरणात पाण्याची आवक वाढल्याने शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी १०.३० वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटाने उचलून १२ हजार ६९ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र आवक वाढतच गेल्याने पाणीसाठ्यावर नियंत्रण राखण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजता धरणाचे दरवाजे ४ फुटाने उचलून कोयना नदीपात्रात २५ हजार ३९९ क्युसेक्स प्रतिसेकंद व धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण २७ हजार ४९९ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून प्रतिसेकंद ३६ हजार ६५९ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून शुक्रवारी सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे ४२ (३८४०), नवजा येथे ५० (४४०४) आणि महाबळेश्वर येथे ३७ (४२८२) मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठा ९४.६२ टीएमसी इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा ८८.९६ टीएमसी आहे. कोयना धरण ८९.३९ टक्के भरले आहे. पश्चिम घाटातील अतिपर्जन्यवृष्टी क्षेत्रातील प्रतापगड येथे ३५ (३७८८), सोनाट २८ (३१६६), बामणोली २८ (२६८४), काठी २३ (२७३८) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या