पावसाचे पुन्हा थैमान; धरणात ६१ हजार क्युसेक पाण्याची आवक
पाटण : दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला म्हणून आज कोयना धरणाचे सह वक्र दरवाजे पूर्ण बंद करण्यात आले. आता फक्त धरण पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे दरवाजे बंद केल्याने कोयना नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला असला तरी तो अल्पजीवी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण गुरुवारी दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात पाण्याची आवक प्रतिसेकंद ६१ हजार क्युसेकपर्यंत गेली आहे. पावसाचा जोर असाच वाढत गेल्यास धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा उघडावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, धरणात ९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे १५ ऑगस्टपासून उघडण्यात आले होते. प्रथम पावणेदोन फूट, नंतर चार, सहा, सात आणि शेवटी दहा फुटांपर्यंत दरवाजे उघडून सुमारे ५६ हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण, कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र गेल्या चोवीस तासांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने काल धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फुटांवरून दीड फुटांवर आणण्यात आले. आज सकाळी दरवाजे बंद करून धरणाच्या पायथा विजगृहातून केवळ २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला. त्यामुळे पाटणसह कराड, सांगली परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मात्र आज दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात येणारी पाण्याची आवक प्रतिसेकंद ६१ हजार ३६१ क्युसेकपर्यंत गेली आहे. सुरु झाल्याने धरणात ९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.दरम्यान पावसाचा जोर असाच वाढत गेल्यास धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात ९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १२ टीएमसी इतक्या पाण्याची गरज आहे.
धरणातून पाणी सोडल्याने पाण्याखाली गेलेले पाटण तालुक्यातील मेंढेघर, संगमनगर जुना धक्का पूल, निसरे फरशी पूल पुराचे पाणी ओसरल्यामुळे कालपर्यंत, तर मुळगाव आणि नेरळे हे दोन मोठे पूलही आता खुले झाले असून या मार्गांवरील वाहतूक गुरुवारपासून सुरळीत झाली आहे. आज सकाळी ८ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २४ (३७३८), नवजा येथे ५८ (४२७३) आणि महाबळेश्वर येथे ३३ (४१७०) मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या