नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून आणखी चिंताजनक झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
८४ वर्षीय प्रणवदा यांना सोमवारी प्रकृतीच्या काही तक्रारींबाबत नवी दिल्लीतील लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, त्यांच्या मेंदूत गाठ होती. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणवदांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रूग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. दरम्यान, प्रणवदांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना संथ गतीने प्रतिसाद देत आहेत, असे त्यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले प्रणव मुखर्जी यूपीए सरकारच्या काळात देशाचे अर्थमंत्री होते. २०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते. २०१९ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या