अस्तित्वातच नसलेल्या योजनेच्या पोस्टद्वारे शेतकऱ्यांंची दिशाभूल | Latest Marathi News

सातारा : ‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना' अशा आशयाची पोस्ट सध्या समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहे. मात्र अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे. अशा आशयाच्या पोस्टद्वारे शेतकऱ्यांंची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. असा उद्योग कोण आणि कशासाठी करत आहे याची चौकशी होण्याची गरज आहे.

उपरोक्त नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही किंवा याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे. सन २०२० - २१ अंतर्गत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनांतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदान अनुज्ञेय आहे. यासाठी शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमाणात पूर्वसंमती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती  प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासंदर्भात दि. १४ जुलैच्या शासन निर्णयानुसार ट्रॅक्टरसाठी अनुदानाचे दर घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किंंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख रूपये यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या ४० टक्के किंवा १ लाख रूपये यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.


आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या