यंग ग्रुप ऑफ शिवशक्तीतर्फे 'कोरोना योध्दा' सन्मान सोहळा
मसूर : कोरोनावर जोपर्यंत औषध निघत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला हे संकट परतवून लावायचे आहे. त्यासाठी त्याविरूध्द लढणाऱ्यांना उमेद देण्याचे काम करा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले आहे.
कराड तालुक्यातील मसूर येथे यंग ग्रुप ऑफ शिवशक्तीतर्फे आयोजित 'कोरोना योध्दा' सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मसूर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, सफाई कामगार (व्हीडीके पॅâसिलिटी सर्व्हिसेस), सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, डॉ. बसवेश्वर चेणगे, ऑलिंपिका इण्डेन गॅसतर्फे अमरजित जाधव, वीज वितरण कंपनीतर्फे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका संगिता गुरव, मदतनीस स्नेहल गिरीगोसावी, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, होमगार्ड सूरज कांबिरे, सामाजिक कार्यकर्ते कासम पटेल, सुनिल वेल्हाळ यांना 'कोरोना योध्दा सन्मानपत्र' प्रदान करून गौरवण्यात आले.
सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सची टंचाई असून ही इंजेक्शन्स घेणे सर्वसामान्यांना परवडण्यासारखीही नाहीत. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी लोकसहभागातून निधी उभा करून ही इंजेक्शन्स उपलब्ध केल्यास आपल्या लोकांच्याच ती उपयोगाला येतील, अशी सूचना अजय गोरड यांनी यावेळी केली. प्रत्येकाने आपल्या घरी ऑक्सिमीटर ठेवावे व घरच्या घरी ऑक्सिजन तपासणी करावी. अनेकजण घरीच आयसोलेशन करून बरे झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
केवळ वयस्कर माणसांनाच कोरोनाचा धोका आहे असे नाही. तरूणसुध्दा दगावत आहेत. रूग्णालयात बेड उपलब्ध झाले नाही म्हणूनही रूग्णांचे मृत्यू होत आहेत. चार जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई आहे. अशा स्थितीत आपल्याला लक्षणे जाणवत असतील, तर टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. मी कसा यातून वाचू शकतो याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यावेळी म्हणाले.
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हायला शंभर वर्षे जावी लागली. प्रत्येकाने शहाणपणाने वागले पाहिजे ही शिकवण यानिमित्ताने मिळाली आहे. आपले घर व समाज सुरक्षित राहण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांचा हा गौरव असून मंडळाचे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू असलेले हे कार्य उल्लेखनीय आहे, असे उद्गार गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी काढले.
काळजावर दगड ठेवून लढणाऱ्यांचा हा सन्मान
दिसणाऱ्या शत्रूशी लढणे सोपे असते. पण न दिसणाऱ्या शत्रूशी लढणे इतके सोपे नसते. म्हणून काळजावर दगड ठेवून लढणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे. अन्यत्र उद्रेक होऊनही जूनअखेरपर्यंत मसूरमध्ये कोरोनाचा प्रवेश नव्हता. परंतु अनलॉकमुळे लोकांच्या हालचाली वाढल्याने संसर्ग वाढत आहे. तेव्हा हे संकट आपल्या घरात यायला नको असेल तर आपणच काळजी घेणे गरजेचे आहे, असे सरपंच पंकज दीक्षित यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास सचिन दीक्षित, कल्याण कांबिरे, चंद्रकांत चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष विक्रम जगदाळे, उपाध्यक्ष राहुल जगदाळे, सचिव विनित जगदाळे, धनाजी जगदाळे, सचिन जगदाळे, उमेश जगदाळे, किशोर दीक्षित व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ह. भ. प. मधुबुवा दीक्षित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


0 टिप्पण्या