नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील लष्करी रूग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षाचे होते. त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची दु:खद वार्ता दिली आणि अवघा देश हेलावून गेला. प्रणवदांच्या जाण्याने देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत, शालीन, चारित्र्यसंपन्न व अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे.
प्रकृती बिघडल्याने १० ऑगस्ट रोजी प्रणवदांना दिल्लीच्या लष्करी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यादरम्यान करण्यात आलेली त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाले होते. मेंदूत गाठी असल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्यानंतर ते कोमात गेले आणि शुध्दीवर आलेच नाहीत. रविवारी सायंकाळपासून त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली होती. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून होते. मात्र आज त्यांची झुंज व्यर्थ ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघा देश हेलावून गेला.
काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या प्रणवदांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील किर्णाहर शहरालगत मिराटी गावच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी सुरी (वीरभूम) येथील सुरी विद्यासागर महाविद्यालयात शिक्षण घेतले. पुढे कोलकाता विद्यापीठातून इतिहास, समाजशास्त्र विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. कायद्याची पदवी घेऊन त्यांनी काही काळ वकिलीही केली. एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असताना पत्रकार म्हणूनही काम केले. त्यांचे वडील १९२० पासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. ते १९५२ ते १९६४ या कालावधीत विधानसभेचे सदस्य आणि वीरभूम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. कालांतराने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रणवदा काँग्रेस पक्षात सक्रिय झाले.
प्राध्यापक, पत्रकार ते देशाचे राष्ट्रपती असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. गेली पाच दशके त्यांनी देशाच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. २०१२ ते २०१७ या कालावधीत ते देशाचे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय पुरोगामी आघाडीने त्यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली होती. माजी लोकसभा सभापती पी. ए. संगमा यांचा त्यांनी पराभव केला. २५ जुलै २०१२ रोजी त्यांनी देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
प्रणवदांची राजकीय कारकिर्द
१९८२ - १९८४ केंद्रीय अर्थमंत्री
१९८० - १९८५ राज्यसभेचे नेते
१९९१ - नियोजन आयोगाचे अध्यक्ष
१९९५ - परराष्ट्रपमंत्री
२००४ - लोकसभा निवडणुकीत विजय
२००४ - ०६ संरक्षणमंत्री
२००६ - ०९ परराष्ट्रमंत्री
२००९ - १२ अर्थमंत्री
२०१२ ते १७ - राष्ट्रपती
मिळालेले मानसन्मान
१९९७ - उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव
२००७ - पद्मविभूषण किताबाने सन्मानित
२०१९ - भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान (२६ जानेवारी २०१९)
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या