माजी पंतप्रधान राजीव गांधी हे नव्या पिढीचे प्रतिनिधी होते. 'मी तरूण आहे आणि माझेसुध्दा एक स्वप्न आहे' असे ते बरेचदा म्हणत. भारत बलवान, स्वतंत्र, स्वावलंबी आणि जगातील देशांच्या पहिल्या रांगेत बसणारा हवा हे त्यांचे स्वप्न होते. प्रत्येक क्षेत्रात सतत सुधारणा घडावी यावर त्यांचा विशेष भर असे. देशात संगणक युग आणून देशाला आधुनिक चेहरा देण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले. नव्या आव्हानांना नवीन विचारांनी सामोरे जायला हवे असे त्यांचे ठाम मत होते. आज त्यांची ७६ वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांची ध्येयधोरणे, त्यांची स्वप्ने आणि योजना यांचा उहापोह...
- विजय उत्तुरे, पुणे.
राजीव गांधी धाडसी, स्पष्टवक्ते, उत्साही व क्रियाशील होते. ते दूरदृष्टी लाभलेले नेते होते. तसेच अत्यंत व्यवहारी होते. जर सध्याच्या व्यवस्थेचे प्रारूप आपल्याला योग्य वाटत नसेल, तर आपण ते बदलले पाहिजे असे ते म्हणत. मनात असेल ते बोलणे आणि तेच कृतीत आणणे हा त्यांचा विशेष स्वभावगुण होता. देशाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर काही आठवड्यातच त्यांनी ज्येष्ठ निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सरकारी खात्यांच्या पुनर्रचनेसंबंधी त्यांना अहवाल तयार करण्यास सांगितले होते. त्यातून काही नवीन खाती निर्माण झाली व काही नोकरशहांच्या बदल्या झाल्या. सरकारी खात्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी त्यांनी व्यावसायिक दृष्टीकोनाचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या. सरकारी कचेऱ्यांमध्ये सर्वत्र नवी उपकरणे व फर्निचर दिसू लागले. त्यामुळे कचेऱ्यांना नवा चेहरा प्राप्त झाला.
राजीवजींनी भारतात दूरवर प्रवास केला. काही वेळा ते दौऱ्याचा कार्यक्रम अचानक बदलून वेगळ्याच ठिकाणाला भेट देत व सरकारी अधिकाऱ्यांना आश्चर्यचकित करत. यामागे प्रत्यक्ष जागेवर जावून वस्तुस्थिती जाणून घेण्याची त्यांची तळमळ दिसून यायची. त्यांना तळागाळातील लोकांशी जवळीक साधून त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या होत्या. त्यासाठी हा नवा मार्ग त्यांनी अवलंबला होता. यातून भारताचे उज्ज्वल भविष्य त्यांना घडवायचे होते हे सिध्द होते. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांची मोलाची साथ त्यांना मिळाली.
उदारमतवादी शैक्षणिक धोरण
शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाइतकेच शाळेबाहेरील शिक्षण महत्त्वाचे आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. यासाठी १९८५ साली त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण तयार करून घेतले. हे शैक्षणिक धोरण सुधारणावादी होते. ब्रिटिशांच्या वसाहतवादी शैक्षणिक धोरणातून मुक्ती देणारे हे धोरण होते. या नवीन धोरणामागील संकल्पना अशी आहे, की सध्याच्या पध्दतीत बदल करून ती एका ठराविक व विशिष्ट दिशेने नेली पाहिजे, असे विचार त्यांनी शैक्षणिक धोरणाविषयीच्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या सभेच्या उद्घाटनप्रसंगी मांडले होते. त्यांनी सुरू केलेले हे उदारमतवादी धोरण नंतर आलेल्या सरकारांनीसुध्दा पुढे चालवले. भारताने व्यापार आणि उद्योगात केलेली नेत्रदीपक प्रगती ही या धोरणाची फळे आहेत. या धोरणामुळेच नव्वदीच्या दशकात आणि नवीन सहस्त्रकात भारत जगातील एक ताकदवान राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. अलीकडच्या काळातील जागतिक मंदीला व तिच्या परिणामांना समर्थपणे तोंड देणे आपल्याला राजीव गांधी यांच्या या दूरदृष्टीने लावलेल्या आर्थिक धोरणामुळे शक्य झाले आहे.
तंत्रज्ञानाच्या युगाचा पाया घातला
राजीव गांधी यांनी भारतात नवीन तंत्रज्ञान आणले आणि भारतातील परदेशी गुंतवणुकीला उत्तेजन दिले. भारताच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानाचा पाया त्यांनी घातला. यासाठी संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास त्यांनी सुरूवात केली. त्यांच्या लॅपटॉपवर सर्व घटनांची माहिती उपलब्ध असे. राज्य आणि केंद्र सरकारच्या खात्यांचे संगणकीकरण त्यांच्याच प्रयत्नांमुळे घडून आले. माहिती तंत्रज्ञात क्षेत्रात भारत हा जगातील अत्यंत प्रगत देश व्हावा असा निश्चय त्यांनी केला होता. संगणक क्रांतीकडे दुर्लक्ष करणे भारताला परवडणारे नाही, असे ते म्हणत असत. सर्वसामान्य लोकांसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. संगणक हा सर्वप्रथम अगदी लहान क्षेत्रातील, खेड्यातील शाळेत वापरला गेला पाहिजे. नंतर त्याचा प्रसार शहरातील शाळांपर्यंत झाला पाहिजे. महासंगणकाचा वापर केल्याने पावसाचा अंदाज, मृदेचे विश्लेषण, पाण्याचा योग्य वापर, पाण्याचा अपव्यय टाळणे, योग्य खतांचा वापर याचे ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध होईल असे त्यांना वाटत असे.
माहिती व तंत्रज्ञान हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि यामुळेच देशाची प्रगती साधता येईल असा त्यांना विश्वास होता. म्हणून त्यांच्या कारकिर्दीत विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रावर विशेष जोर देण्यात आला. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकलो आणि जगात भारताची पत वाढली. सद्यस्थितीत आपण माहिती तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे निर्यातदार आहोत याचे मोठे श्रेय राजीव गांधी यांना जाते.
अवकाश संशोधन कार्यक्रमाला चालना
राजीव गांधी पंतप्रधान असताना अवकाश संशोधनाच्या कार्यक्रमाला चालना मिळाली. या कार्यक्रमांतर्गत उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आपण नासा विंâवा रशियाच्या प्रक्षेपकावर अवलंबून राहण्यापेक्षा त्यामध्ये भारतीय बनावटीची प्रक्षेपके वापरली जावीत यासाठी त्यांनी शास्त्रज्ञांना उत्तेजन दिले. त्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात दिलेली चालना नंतर सत्तेवर आलेल्या सरकारांना फायद्याची ठरली. याचाच परिपाक म्हणजे १९९० साली आपल्याला एएसएलव्ही व पीएसएलव्ही यामध्ये आणि एप्रिल २००१ मध्ये जीएसएलव्ही यामध्ये मोठे यश मिळाले. सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी राजीव गांधी यांनी पंचायत राज प्रणालीचा वापर ग्रामीण जनतेचा सत्तेतील सहभाग वाढावा यासाठी केला. पंचायत राज प्रणालीचा उपयोग हा त्यांच्या मते भ्रष्टाचार निर्मूलनाचा एक मार्ग होता. तळागाळातील समाजाच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवावी असा विचार त्यामागे होता. महात्या गांधी यांच्या खNया लोकशाहीचे स्वप्न साकार करण्याचा तो एक प्रयत्न होता.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत ते म्हणत, आपण लोकांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याचे वचन दिले आहे. आपण त्या दिशेने पावले उचलली आहेत. आपण भ्रष्टाचाराचा प्रत्येक पातळीवर सामना करत आहोत. प्रशासनात सुधारणा करण्याविषयी आपण वचनबध्द आहोत. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढत आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. परंतु तो कुठल्याही धर्माच्या विरूध्द नाही. सर्व धर्मांविषयी येथे आदर बाळगला जातो. सर्वधर्म समभाव याचा प्रत्यय भारतीय समाजात अनेकदा येतो. राजीव गांधींचे हेच विचार होते. सरकारचा कोणताही धर्म नसतो. सरकार हे धर्मातीत असते. सरकारच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा समान आहे अशी त्यांची धारणा होती.
लेखाचा समारोप करताना भविष्यातील भारताविषयी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा उल्लेख करणे उचित ठरते. भविष्यातील भारत हा आपल्या स्वातंत्र्याविषयी अभिमान बाळगणारा असेल. त्याच्या रक्षणासाठी समर्थ असेल. अन्नधान्य, उद्योग आणि उच्च तंत्रज्ञानाच्या विषयात स्वयंपूर्ण असेल. जात आणि धर्म यांच्या सीमांपलीकडे जावून एकत्रित झालेला असेल. दारिद्र्याची बंधने गळून पडलेली असतील आणि सामाजिक व धार्मिक समता प्रस्थापित झालेली असेल.
(लेखक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या