तमाशा बोर्डावरची महाराणी ... मंगला बनसोडे करवडीकर | विशेष लेख


गेली सहा दशकं जिनं आपल्या गीत संगीत आणि अभिनयानं महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या रसिक मनाला भुरळ पाडली अशी माझी माय मंगल बनसोडे हिचा आज (१२ सप्टेंबर) जन्मदिवस. वयाच्या सातव्या वर्षी पायात एकेक किलोचे चाळ बांधून तिनं रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तशी मंगलताई साळसूद भोळी भाबडी. जिचा जन्म राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या उदरी ज्येष्ठ कन्येच्या रूपानी झाला. मंगल आज वयाच्या ६७ वर्षात पदार्पण करतेय. त्यानिमित्त...

मंगलाताई म्हणजे तमाशाच्या बोर्डावरची महाराणीच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाच पिढ्याचा तमाशा आज मंगलताई करतेय याची माझ्यासारख्या सामान्य माणसाला भुरळच पडली. नारायण खुडे नारायणगावकर, भाऊबापू मांग नारायणगावकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, मंगला विठाबाई नारायणगावकर, नितीन - अनिल मंगला विठाबाई नारायणगावकर करवडीकर इत्यादी. आईचा वारसा जपत आणि तिचे अनुकरण करत मंगलाताई  दिवसेंदिवस मोठी झाली. कुठेही मोठाडपणाचा आव नाही, की मीपणाचा गर्व नाही. ती सतत तमाशा परंपरेतील लोककलावंतांच्या वाताहतीबद्दल चिंतन करते. आज कोरोनाच्या महामारीमुळे तमाशातील लोक कलावंत उपाशी पोटी झोपतोय, त्याची खाण्यापिण्याची गैरसोय होतेय याची जणू तिला भ्रांत पडली. म्हणून तिने माझ्याकडे, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांच्याकडे खेदही व्यक्त केला. 

आज कोविड१९ च्या परिस्थितीत काय करावं सुचत नाही या विवंचनेत असताना तिने थेट महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या इतिहासाचे साक्षीदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जन्मदाते लोककलावंतांचे आश्रयदाते खासदार शरद पवार साहेबांनाच साकडं घातलं. विठाबाईच्या संस्कारात वाढलेली मंगल आज जरी वयाने मोठी झाली असेल, तरी तिने अनेक दु:ख अक्षरश: पोटात घातलीत. रसिक मायबापाची सेवा करतांना ती कुठेही डगमगत नाही. अगदी १९७६ ला नितीनचा जन्म असो की, गोव्यातला कार्यक्रम असो, तो रद्द झाल्यावर तिचा श्रध्दांजलीचा फ्लेक्स कोल्हापुरात दिसला तरी तिने कच खाल्लीच नाही. 

अशीच नितीनच्या जन्माची एक सत्य घटना मुदामहोऊन इथे नमूद करावीशी वाटते. विठाबाईच्या सांगण्यावरून वगसम्राट रामचंद्र बनसोडे यांच्याबरोबर विवाह बंधनात अडकल्यानंतर मंगलने स्वत:चा तमाशाचा फड काढला. रामचंद्ररावांनी स्व:ताची जमीन विवूâन भागभांडवल उभं केलं आणि मंगलचा झंझावात सुरु झाला. बनसोडे साहेबांनी अनेक वगनाट्ये लिहिली. त्यांनी ऐेतिहासिक, पौराणिक, सामाजिक वगांची बांधणी केली. त्यात बापू बिरु वाटेगावकर, विष्णू बाळा, मुंबईची केळीवाली या वगनाट्यांनी महाराष्ट्र गाजवला. 

अशा प्रतिभासंपन्न कलावंताबरोबर संसार थाटल्यानंतर नितीनसारखा चौरंगी चिरा मंगलताईच्या पोटात गर्भरूपी वृद्धिंगत होत होता. नऊ महिने भरून पुरले होते. बोर्डावर रामचंद्ररावांनी लिहिलेला वग 'जावळीचा फडकला भगवा झेंडा' हा सुरू होता. ही घटना आहे १९७६ मधील मु. कवठेमहांकाळ इथली. स्वत: रामचंद्र बनसोडे बोर्डावर गणुजी शिर्के यांची भूमिका करत होते, तर मंगलाताई मोहणाची भूमिका साकारत होती. अशातच स्टेजवरच मंगलताईच्या ओटीपोटात कळ उठली, पण त्या वेदनेकडे तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्या आवेशात भूमिका निभावत होती. नऊवारीत काष्ट्यातून ओघळ आला रक्ताचा लाल बुंद. ते रामचंद्रांनी पाहिलं आणि क्षणभरात त्यांना भोवळ आल्यासारखी झाली. रसिक मायबाप वगात तल्लीन झाला होता. अचानक हिला जायला कसं सांगू ही विवंचना रामचंद्र बनसोडे यांना पडली. त्यातही समयसूचकता पाहून त्यांनी संवाद फेकला, मंगल हे काय होतंय, तू राहुटीत जा. पोटाची कळ मारून मंगल राहुटीत आली. आयाबायांनी मंगलला राहुटीच्या पाठीमागे नेलं आणि पुसपास करून पॉट बांधून मंगल पुन्हा बोर्डावर उभी राहिली. आजचा खेळ संपला. त्याच लगबगीत पुढे मुलगा जन्माला आला. त्याचं नाव नितीन बनसोडे.

या कलावंतीनीला आणि तिच्या आयुष्याला अशा अनेक घटना हुलकावणी देऊन गेल्या. मुलाचा अपघाती मृत्यू तिने उघड्या डोळ्याने पाहिला, तर तंबू जळण्यापासून ते स्वत:च्या श्रद्धांजलीच्या बॅनरपर्यंत सर्व पाहिलं. मात्र हार काही मानली नाही. रसिकांच्या रसिकतेपोटीच तिने या अनेक यातना भोगल्या. एक मात्र खरं आहे, की तिने तमाशा काही आजपर्यंत सोडला नाही. ती आजही या वयात अविरतपणे तमाशाची सेवा करतच आहे. आज दीडशे लोकांचा चमू घेऊन ती महाराष्ट्राचा आठ महिने दौरा करते. पाणी, पाऊस पाहत नाही की वादळ वारा. पण आज मात्र कोरोनाच्या महामारीने हतबल झाली आहे. माझा तमाम महाराष्ट्रातील लोककलावंत आज हातघाईला आलाय. अशातही कोरोनाकाळात गोरगरीबांना जीवनोपयोगी साहित्य या परिवाराने वाटले. ती जेवडी मायाळू आहे, तेवडीच दानशूर. मुलंसुद्धा तिच्या संस्कारावर गेली आहेत. 

मंगलताईचे किस्से खूप आहेत. तिचा एक किस्सा तर मोठा भयानक आहे. लातूर जिल्ह्यात तिचा कार्यक्रम होता. अचानक निसर्गाने घाला घातला. प्रचंड मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गाड्या चिखलात रूतू नयेत म्हणून तिने तंबू काढायला सांगितला. सर्व सामान गाड्यात भरलं आणि रात्री पुढच्या गावाचं नियोजन केलं. साठ किलोमीटरचा प्रवास करून पुढचा मुक्काम ठोकायचा होता. कलावंत उपाशीपोटी होते. दरमुक्काम दरकोस करत गाड्यांचा ताफा निघाला. पाच - पाच किलोमीटरवर गाव लागंल, तिथं थांबायचं हे तिने निश्चित केलं होतं. कारण १५० कलावंत उपाशी होता. धर्मशाळा, ग्रामपंचायत, चावडी इथे विनंत्या करूनही तिला उतरण्याची परवानगी मिळाली नाही. शेवटी १२ कोसावर आल्यानंतर एक मिणमिणता प्रकाश दिसला आणि तिच्या जीवात जीव आला. स्वयंपाकी, कलावंत खाली उतरले. छोटीशी राहुटी टाकली, जेवण बनवलं, सगळे जेवले. थोडं उजाडल्यावर बघतात तर काय, ती त्या गावची स्मशानभूमी होती. 

सगळं मनात साठवून या मायमाऊलीने तमाशा काही सोडला नाही. तिला अनेक प्रलोभने आली, आमिषं आली, पण तिने आपला तमाशाचा प्रकृती पिंड सोडला नाही. विठाबाईच्या घराण्याला कुठे गालबोट लागता कामा नये याची आजही काळजी घेते. अगदी पंढरपूरमधून खासदारकीचं तिकीटसुद्धा मिळालं. पण तमाशा माझं जगणं, तमाशाच माझी तहानभूक आणि आयुष्य हेच तिचं ध्येय आहे. पाच पिढ्याचा तमाशा करतांना तिचा उर भरून येतो. रामचंद्ररावांच्या पश्चात ती नितीन आणि अनिलच्या जीवावर तमाशाचे खेळ लावते. मात्र मुलीमुलांच्या लेकरांना उच्च शिक्षितही बनवते. एक नात मुंबईच्या केईएम रुग्णालयात एमडी डॉक्टर आहे. नातू इंजिनियरिंग करतोय. पण कलेची कास म्हणून नितीनची धाकटी लेक सायली आता सहाव्या पिढीचा तमाशा साकारण्यात सज्ज आहे याचं मला कौतुक वाटतं. मंगलाताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

- डॉ. गणेश चंदनशिवे,

विभागप्रमुख, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या