सातारा : महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली, ना पत्रकार विमा योजना सुरू केली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असून तो व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाभर जोरदार उठाव केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देवून तातडीने पत्रकारांच्या विम्याची मागणी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेने याप्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याला सर्वात मोठा प्रतिसाद सातारा जिल्ह्यात मिळाला. जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांमधील पत्रकार संघांनी त्या त्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन दिले. तर सातारा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, आमदार शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना कोरोना योद्धे असलेल्या पत्रकाराचे कोरोनाने निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यात आतापर्यंत २७ पत्रकारांचे कोरोनाने बळी जावूनही एकाही पत्रकाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची काय दमडीचीही मदत सरकारकडून मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये मोठा संताप आहे. सातारा जिल्ह्यातही कराडचे मोहन कुलकर्णी यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील पत्रकारांच्या कुटुंबांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकारांना विमा कवच देण्याबाबत निणNय घेतला जाईल अशी घोषणा केली होती. मात्र, त्याबाबतही कोणताच निर्णय सरकारने घेतला नसल्याने राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत. कोविड सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नाहीत आणि खासगी रूग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत अशा कात्रीत पत्रकार सापडले आहेत. योग्य उपचार न मिळाल्याने पुण्यात पांडुरंग रायकर तर माथेरानमध्ये संतोष पवार या दोन पत्रकारांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही जिल्हा पत्रकार संघाने केली.
शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील पत्रकारांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ठरल्याप्रमाणे मेसेज करून मागणी केली. त्यानुसार जिल्ह्यातील पत्रकारांनी मेसेज करुन त्यांच्यावर भडीमार केला. कोरोनाने मृत्यू झालेल्या दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. सातारा येथील आंदोलनावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, सुजित आंबेकर, राहुल तपासे, ओंकार कदम, तुषार तपासे, दीपक दीक्षित, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, चंद्रसेन जाधव, मोहन मस्कर-पाटील, अरुण जावळे, प्रतीक भद्रे, सनी शिंदे, किरण मोहिते, साई सावंत, ओंकार गिरी, अनुराग धिवार, जावेद खान, आतीष चतुर, प्रकाश वायदंडे, महेश क्षीरसागर, प्रकाश शिंदे, ओंकार सोनवले, तबरेज बागवान, रिजवान सय्यद यांच्यासह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सभापतींनी राज्य शासनाला निर्देश द्यावेत
राज्यातील पत्रकार अडचणीत आहेत. २७ जणांचा बळी गेला आहे. घोषणेची अंमलबजावणी राज्य शासनाने केली पाहिजे. राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचे सभापती म्हणून आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व राज्य शासनाला तातडीने निर्देश द्यावेत अथवा तशी बैठक बोलवावी, अशी मागणी हरीष पाटणे यांनी यावेळी रामराजे नाईक - निंबाळकर यांच्याकडे केली. आपण तातडीने राज्य सरकारशी चर्चा करु असे रामराजे यांनी यावेळी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या