सातारा : कोरेगाव शहरात सध्या दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याने वैतागलेल्या संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत चक्क नगराध्यक्षांच्या दालनातच प्रतीकात्मक महाळ घालून नगरपंचायतीच्या कारभाराबद्दल अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी दूषित पाण्याने ग्रस्त झालेल्या व मागील काही दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या कोरेगावमधील नागरिकांच्या स्मृतीस नैवेद्य दाखवून आदरांजली वाहण्यात आली.
कोरेगावच्या पाणीपुरवठा योजनेचे एमआयडीसी व रेल्वे स्टेशन येथील दोन्हीही जलशुद्धीकरण प्रकल्प बरेच दिवस नादुरुस्त अवस्थेत आहेत. शहरातील विविध संघटना, नागरिकांनी नगरपंचायतीला वारंवार निवेदन देऊन जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जनरेटा उभारला होता. मागील मे महिन्यापासून या प्रश्नावरून नागरिक व नगरपंचायतीत वारंवार संघर्षही पेटला होता. सोनेरी ग्रूपने नगरपंचायतीला घेराव घालून जलशुध्दीकरण प्रकल्प तत्काळ दुरुस्त करण्याची मागणीही केली होती. त्यावर निविदा प्रक्रिया सुरू करून दुरुस्ती सुरू करीत असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले होते. मात्र, अद्याप त्यामध्ये प्रगती नाही. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातत्याने गढूळ, मातीमिश्रित पाणी नागरिकांना नळाद्वारे मिळत असून त्यावर कोरेगाव शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
काल सकाळी सोनेरी ग्रूपच्या सदस्यांसह शहरातील काही नागरिक निवेदन घेऊन नगरपंचायतीला जाब विचारण्यासाठी गेले होते. बराचवेळ कोणीही निवेदन घेण्यासाठी येत नसल्याने ग्रूपच्या वतीने नगराध्यक्षा रेश्मा कोकरे यांच्या दालनात रिकाम्या खुर्चीसमोरच प्रतीकात्मक महाळ घालून दूषित पाण्याने ग्रस्त झालेल्या व मागील काही दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या कोरेगावमधील नागरिकांच्या स्मृतीस नैवेद्य दाखवून आदरांजली वाहण्यात आली. नगरपंचायतीचा एक सुद्धा जबाबदार पदाधिकारी, नगरसेवक निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित न राहिल्याने नागरिकांनी त्यांचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या दालनात जाऊन आपले निवेदन सादर केले. त्यांनी तत्काळ नगरपंचायत अभियंता काकडे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रताप बुधावले यांना बोलावून घेत दूषित पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या