सातारच्या प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर | Latest Marathi News


अशोक कोळी, देविका दफ्तरदार, गणेश विसपुते, अविनाश पाटील, विनोद कांबळे, हिमांशू स्मार्त यांचा समावेश

सातारा : सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचे साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तनासाठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमध्ये सहा मान्यवरांचा समावेश आहे. 
गेली वीस - पंचवीस वर्षे सातत्याने जे आपल्या क्षेत्रात निष्ठेने काम करत आहेत त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. दहा हजार रुपयांचे चार व पाच हजार रुपयांचे दोन असे एकूण सहा पुरस्कार यात आहेत. याआधी दोन वर्षे पंचवीस हजार रुपयांचे दोन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासह पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी आणि लेखक प्रमोद कोपर्डे यांनी दिली.
कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कारासाठी प्रसिध्द कथा, कादंबरीकार अशोक कौतुक कोळी (जामनेर, जि. जळगाव), प्रा. मनोहर कोपर्डे स्मृती कला पुरस्कारासाठी प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार (पुणे), डॉ. चंद्रशेखर जहागीरदार स्मृती संस्कृती पुरस्कारासाठी प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक, संपादक गणेश विसपुते (पुणे), हुतात्मा विलास ढाणे स्मृती समाज परिवर्तन पुरस्कारासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील (धुळे) यांची निवड करण्यात आली आहे. दहा हजाराचा धनादेश, मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
नवोदितांसाठी असलेल्या राधाबाई किसन कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कारासाठी विनोद कांबळे (कोल्हापूर), पारुबाई भानुदास परदेशी स्मृती कला पुरस्कारासाठी हिमांशू स्मार्त (कोल्हापूर) यांची निवड झाली आहे. पाच हजारांचा धनादेश, मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
पुरस्कार निवडीचे काम प्रतिष्ठानचे विश्वस्त कवी, लेखक, अनुवादक, संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे, समीक्षक डॉ. गजानन अपिने आणि कवी, साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या समितीने पाहिले. प्रतिष्ठानच्या विश्वस्तांमध्ये अँड. श्रेयश कोळेकर (कराड), ज्योत्स्ना पाटील - शिंदे (मुंबई), सातारचे रंगकर्मी चंद्रकांत कांबिरे व कवी वसंत शिंदे यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण सध्याचा कोरोनाकाळ लक्षात घेऊन कधी घ्यायचा हे नंतर जाहीर करण्यात येईल.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या