मुंबई : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारप्रमाणेच या समाजाला शिक्षण व रोजगारासाठी आरक्षित घटकांप्रमाणे सवलती द्याव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू करण्यास कालावधी लागत असताना भाजप सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगारासाठी विविध सवलती दिल्या. पण भाजप सरकारच्या सारथीसारख्या अनेक उपक्रमांमध्ये महाविकास आघाडी सरकारने अडथळे निर्माण केले आहेत आणि आर्थिक तरतूद रोखून संकटे निर्माण केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब आपली भूमिका बदलून मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारच्या पुढाकाराने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यात आले व त्याचे लाभही मिळायला लागले होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय गेल्यानंतर राज्य सरकारने ढिलाई केली आणि आरक्षणाला स्थगिती आली. आता सर्वोच्च न्यायालयात कधी निकाल लागेल व पुन्हा आरक्षण लागू होईल याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणासाठी व रोजगारासाठी सवलती देऊन आरक्षणासारखा लाभ दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकाससंस्था (सारथी) ही संस्था भाजप सरकारने सुरू केली. मराठा समूहाच्या प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, नोकरी व्यवसाय मार्गदर्शन, भरतीपूर्व मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे संपूर्ण कामकाज ठप्प केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या