सातारा : सन १९८६ नंतर पूर्ण शिक्षणात बदल करणारी नीती नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे आलेली आहे. कोणत्याही नीतीत मार्गदर्शक तत्वे असतात. त्याआधारे योजना तयार होत असतात. आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव हिचा होणार आहे, म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी सर्वंकष अभ्यास करायला हवा, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीने सिस्टीमचा अभ्यास केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या ’नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. चंद्रकात खिलारे होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर उपस्थित होते.
पूर्वीच्या राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग यांचा दाखला देत थोरात पुढे म्हणाले की, या दोन्ही समित्यांनी सर्व राज्यातील डेटा गोळा केला होता. मोठ्या प्रमाणात अभ्यास केला होता. कोठारी कमिशनने तर सिस्टीमचा बेसिक स्टडी केला होता. नवीन शैक्षणिक धोरणात उच्च गुणवत्तेचे अध्यापन, संशोधन आणि युनीटरी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे सुचविले आहे. आता विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आहेत ती कमी करून अमेरिकन पद्धतीचे मॉडेल घेऊन युनिव्हर्सिटी तयार करायचे धोरण आहे. कॉलेज एकत्र करून क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याची शक्यता आहे.
विद्यापीठापासून हे कॉलेज स्वतंत्र करण्याचे धोरण असून त्यांनाच पदवी प्रदान करण्याचे अधिकार देणार आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल, गरीब, दलित, आदिवासी किंवा मागास घटकांचे पुढे काय होईल हा अभ्यास केलेला नाही. जवळचे कॉलेज जाऊन सिटी युनिव्हर्सिटीत शिकणे परवडणार का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मल्टी डिसिप्लीनरी कोर्स, अभ्यासक्रम वाढतील. विद्याथ्र्यांला दुसऱ्या वर्षी अभ्यासक्रम बदलता येईल, त्यामुळे जरी इच्छेनुसार शिक्षण होणे योग्य होत असले तरी तो उच्च शिक्षणातून गळणार नाही ना हा विचार करायला हवा. कला शाखेचा विद्यार्थी सायन्सला जाईल का ? समूह विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालये या संकल्पनेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महाविद्यालये बंद पडली तर या भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होणार नाही हेदेखील पहायला हवे, असे ते म्हणाले.
धोरणात गरिबांच्या शिक्षणाचा विचार नाही
डिग्री कोर्स सुरु करताना पूर्वीच्या शिक्षणाने काय साध्य केले हा अभ्यास आवश्यक आहे. मूल्यशिक्षण हे या धोरणात आणले जात आहे. पण ते आपल्याला नवीन नाही. राधाकृष्णन आयोग ,कोठारी आयोग यांनीदेखील शिक्षणात मूल्य शिक्षण आणले होते. आपल्या संविधानात ही सगळी मूल्ये आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता ही मूल्ये शिक्षणात महत्वाची मानून नीती शिक्षण आजवर देण्यात आले. लिंग, जात, वर्ण वंश यावरून भेदभाव नाही अशी मूल्ये शिक्षणात आली. त्यातून जबाबदार उत्तम नागरिक घडवण्याचे संस्कार रुजवण्यात आले. घटनात्मक मूल्य देशाला एकत्र ठेवतात. नव्या शैक्षणिक धोरणात प्राचीन ज्ञानावर आधारित व धर्मावर आधारित मूल्ये दिलेली आहेत. सेवा, अहिंसा, सत्य, माठ्यांचा आदर, देशभक्ती इत्यादी सांगितली आहेत. पण ही मूल्ये कोणत्याही धर्माशी निगडीत ठेवू नयेत. उदा. कर्म सिद्धांत पाहिला तर प्रत्येक धर्मात कर्माचे स्वरूप वेगळे आहे. म्हणूनच वैश्विक असणारी मूल्ये हीच महत्वाची आहेत. संस्कृत भाषा सर्वाना आलीच पाहिजे असा आग्रह नवीन शैक्षणिक धोरणात आहे आणि मुख्य प्रवाह झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. तीन भाषा हे सूत्र स्वीकारले असताना संस्कृतचा आग्रह का हा प्रश्न आहे. या धोरणात योग, गणित इत्यादी विषय संस्कृत भाषेतून शिकवायचे आहेत. संस्कृत विद्यापीठ काढायचे आहे. शिक्षणशास्त्र आणि संस्कृत यांची सांगड घालून डिग्री कोर्स बनवण्याचा विचार आहे. अर्थात पर्शियन, पाली, प्राकृत, तेलगु या प्राचीन भाषा असूनदेखील धोरणात विचार असला तरी संस्कृतला अधिक महत्व दिले आहे. थोडक्यात ड्रस्टीक चेंज केलेला आहे. पुढच्या काळात पीएच.डी., एमए डिग्री घेणे हे अवघड होत जाणार आहे. गरिबांच्या शिक्षणाचा विचार या धोरणात आढळत नाही. समितीने इकॉनॉमिक क्लासेसचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळेच सर्वांनी या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करायला हवा असे ते म्हणाले.
प्रारंभी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी उद्घाटन करून मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. अनिसा मुजावर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. केशव पवार यांनी केले. वेबिनारला दीड हजार अभ्यासक उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या