कोयना धरण ओव्हरफ्लो; दरवाजे पाऊण फूट उचलले | Latest Marathi News


धरणातून प्रतिसेकंद 9 हजार 274 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Marathi News... नितीन खैरमोडे / पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून शिवाजी सागर जलाशयात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या जलाशयात 7 हजार 278 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. 105.25 टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणातील साठवण क्षमता संपुष्ठात आल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे पाऊन फुटाने उचलून 7 हजार 174 आणि पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर 2 हजार 100 असा एकूण 9 हजार 274 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांकडून देण्यात आली.
चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने कोयना धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात धरणातील पाणीसाठ्याने नव्वदी पार केली होती. ऑगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली होती. तब्बल 56 हजार क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याने नद्यांंच्या पाणीपातळीत मोठी वाढ होवून पाटणसह, कराड, सांगली परिसरात महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही बंद करण्यात आला होता. अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा शंभरीकडे निघाला होता. अखेर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाणलोट परिसरात पावसाने सुरूवात केल्याने सध्याच्या घडीला कोयना धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
कोयना धरण सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात 105.25 टीएमसी एवढा पाणी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी 1 वाजता धरणाचे 2 दरवाजे एका फुटाने उघडून व पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दिवसभरात शिवाजीसागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच गेल्याने धरणाचे सर्व दरवाजे पाऊण फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सध्या धरणात 7 हजार 278 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. दि. 7 जूनपासून आजअखेर कोयनानगर येथे (4296), नवजा (4972), महाबळेश्वर (4926) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आजची पाणीपातळी 2163.06 फूट व 659.435 मीटर इतकी उंची झाली आहे. दरम्यान, आजच्या घडीला धरणात तब्बल 105.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यापुढे धरणात पाणी साठवता येणार नाही. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार बुधवार दि. 23 रोजी कोयना धरणाचे दरवाजे सहा वक्री दरवाजे पाऊन फुटाने उघडून 7 हजार 174 आणि पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर 2 हजार 100 असे एकूण 9 हजार 274 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, पावसाचे कमी-जास्त प्रमाण पाहता धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जावू नये, असा इशाराही पाटण नगरपंचायतीकडून देण्यात आला आहे.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या