परवाना नसतानाही अनधिकृत प्रॅक्टिसबद्दल पुन्हा अटक
औरंगाबाद : गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी शिक्षा लागलेल्या परळी वैजनाथ येथील डॉ. सुदाम मुंडे याने जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा अनधिकृतपणे प्रॅक्टिस सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोग्य विभाग व पोलिसांनी त्याच्या हॉस्पिटलवर छापा टाकून झाडाझडती घेतली असता हॉस्पिटलमध्ये गर्भपाताचे साहित्यही आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. मुंडेविरूध्द परवानगी नसताना दवाखाना चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील परळीत डॉ. मुंडे याने त्याच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान व गर्भपाताचा बेकायदा राजरोसपणे धंदा चालवला होता. राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातून त्या ठिकाणी गर्भपाताच्या केसेस येत होत्या. हा प्रकार उघडकीस आल्याने प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. त्यामुळे बीड जिल्ह्याची राज्यभर नाचक्की झाली होती.
याप्रकरणी मुंडे हॉस्पिटलसह डॉ. सुदाम मुंडे याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला होता. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा लागली होती. परंतु कोरोना परिस्थितीमुळे डॉ. मुंडे याला जामीनावर सोडल होते. त्यामुळे बाहेर आलेल्या डॉ. मुंडे याने अनधिकृतपणे प्रॅक्टिस सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री स्वत: जिल्हाधिकारी परळीत दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून रात्रभर हॉस्पिटलची झाडाझडती घेतली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये गर्भपाताचे साहित्यही आढळून आल्यानंतर आज पहाटे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या गंभीर प्रकरणाबाबत बेटी बचाव अभियानाच्या नेत्या अॅड. वर्षा देशपांडे यांची तिखट प्रतिकिया पहा व्हीडीओमध्ये...

0 टिप्पण्या