सूर्यग्रहणाशी नजर भिडवत तिने दिला सुदृढ कन्येला जन्म | Latest Marathi News


ग्रहणसंबंधी अंधश्रद्धांना दिली मुठमाती; अंनिसने सिद्ध करून दाखवले

Marathi News... विपुल शहा / शिराळा : सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी हे करू नये, ते करू नये असे म्हणत पिढ्यानपिढ्यांपासून अंधश्रद्धेच्या जटील जंजाळात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी इस्लामपूर येथील एका सावित्रीच्या लेकीने सात महिन्याची गर्भवती असताना भाजी चिरली, फळे तोडली, अन्न ग्रहण केले, मांडीवर मांडी घालून बसली. एवढे करूनच ती थांबली नाही तर सोलर चष्म्यातून तिने थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. ग्रहण काळात जे करायचे नाही ते करून दाखवत तिने एका कोणतेही व्यंग नसलेल्या सुदृढ अशा सूर्यकन्येला जन्म देत या अंधश्रद्धेला मुठमाती दिली. त्यामुळे समाजाने आतातरी डोळस होण्याची गरज आहे.

समृद्धी चंदन जाधव असे या सावित्रीच्या लेकीचे नाव. कल्पना चावलाने अंतरिक्षात जावून महिलांची कर्तबगारी सिद्ध केली होती. तर दुसरीकडे ग्रहण काळातील अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून पडलेल्या समाजाला बाहेर काढून त्याला डोळस बनविण्याची कर्तबगारी समृद्धी यांनी करून दाखविली आहे. २१ जूनला सूर्यग्रहण होते. ग्रहणाचे गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतात. ग्रहण लागण्यापूर्वी आंघोळ करावी, ग्रहण सुटल्यावर आंघोळ करावी. यामधल्या काळात काही खाऊ-पिऊ नये. देव-धर्म, जप करावा. कोणतीही हालचाल करू नये. नाहीतर होणारे अपत्य व्यंगत्व घेऊन जन्माला येते, असा हा सगळा मानसिक गुलामगिरीचा पगडा अद्याप कायम आहे. या मानसिक गुलामगिरीच्या चिंधड्या उडविण्याचे काम समृद्धी जाधव यांनी अंनिसच्या साथीने करून दाखवले.

ग्रहण काळात गर्भवती महिलेने अशा काही गोष्टी केल्यास जन्माला येणारे अपत्य हे व्यंग घेऊन येते किंवा त्या बाळाला जन्मत:च काही दोष तयार होतात असे गैरसमज आहेत. हे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने  करत आहे. राज्याचे प्रधान सचिव संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, प्रा. बी. आर. जाधव, प्रा. तृप्ती थोरात, डॉ. प्रमोद गंगनमाले, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमोरे, अवधूत कांबळे, प्रशांत इंगळे यांनी जाधव कुटुंबियांचे प्रबोधन करत ग्रहण काळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, गर्भवती महिलेवर किंवा होणाऱ्या बाळावरसुद्धा कोणताही परिणाम होत नाही असा विश्वास दिला. त्यामुळे हे कुटुंबीय ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून देण्यास तयार झाले. ग्रहण काळात जे जे करायचे नाही ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. जाधव कुटुंबियातील समृद्धी यांच्या सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दीपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. सामान्य कुटुंबातील समृद्धी जाधव यांनी उचललेले हे पुरोगामी पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.

प्रत्येक ग्रहणावेळी प्रबोधन करणार !

ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर किंबहुना बाळावर कोणताही परिणाम होत नाही हा माझा अनुभव आहे. अंनिसच्या कार्यकत्र्यांनी माझे व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे. यापुढील प्रत्येक ग्रहणाच्या वेळी मी व माझे कुटुंबीय प्रबोधन करणार आहे. 'विज्ञान, निर्भयता - निती, नसे कशाचीही भीती' ही घोषणा सर्वांनी लक्षात ठेवावी.

- समृद्धी जाधव.

समृद्धीने सिद्ध करून दाखवले

बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यातच पूर्ण झालेली असते. अशावेळी ग्रहण पाहिल्याने किंवा शारीरिक हालचाल वा कृती केल्याने बाळाला व्यंगत्व येते ही अंधश्रद्धा असून भीतीपोटीची मानसिक गुलामगिरी आहे. समृद्धी जाधवने सुदृढ बाळाला जन्म देत या अंधश्रद्धा असल्याचे सिद्ध करून दाखवले.

- डॉ. सीमा पोरवाल, प्रसूती तज्ञ, इस्लामपूर.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या