मोबाईल घेता न आल्याने गळफास घेऊन संपवले जीवन
Marathi News... कराड : कोरोना महामारीमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाने एका गरीब, अगतिक मुलीचा घात केला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेता येत नसल्यामुळे नैराश्य आलेल्या दहावीतील विद्यार्थिनीने अखेर गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना कराड तालुक्यातील ओंड या गावी घडली आहे. साक्षी आबासाहेब पोळ (वय १५) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना जबर फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधण्यात आला आहे. पण हातावर पोट असलेल्या कुटुंबात मोबाईलअभावी अनंत अडचणी येत आहेत. त्याच अडचणीने ओंडच्या पोळ कुटुंबाची गेले काही महिने मानसिक ओढाताण सुरू आहे.
साक्षीच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई मोलमजुरी करून घर चालवते. घरी आई, साक्षी व तिचा भाऊ अक्षय अशा तिघांचे हे कुटुंब चालवताना त्यांची दमछाक होत आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून साक्षी आईकडे मोबाईलची मागणी करत होती. मात्र पैसे नसल्यामुळे आपण दिवाळीपर्यंत मोबाईल घेऊ असे सांगून आईने तिची समजुत घातली होती.
तथापि, ऑनलाईन शिक्षण सुरूच असल्याने साक्षीच्या जिवाची उलघाल सुरू होती. चार महिन्यांपासून ती शेजारी पाजारी तसेच मैत्रिणींकडे जावून ती अभ्यास करत होती. दररोज मोबाईलसाठी इतरांच्या घरी जायला लागत असल्याने ही बाब तिने मनाला लावून घेतली होती. शनिवारी सकाळी आई रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी गेली होती. काही वेळाने धान्य घेऊन ती घरी आली. धान्य घरात ठेवून ती मोलमजुरीसाठी शेतात गेली. तेथून तिने शेजारच्या एका मुलीला फोन करून साक्षीला शेतात पाठवून दे असे सांगितले. त्यामुळे संबंधित मुलगी साक्षीला आईचा निरोप देण्यासाठी तिच्या घरी गेली असता साक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्या मुलीला पहायला मिळाले. ते पाहून तिला धक्का बसला.
तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही त्या ठिकाणी धावले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने ओंड परिसरासह तालुक्यातील लोकांची मने हेलावली आहेत. घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या