साडेसात हजार सौर कृषीपंप बसवण्यास मान्यता | Latest Marathi News


रात्रीअपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी धडपडणाऱ्यांना दिलासा

Marathi News... नागपूर : अनिश्चित वीज पुरवठ्यामुळे झोपेचे मातेरे करून रात्रीअपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वर्गाला धडपडावेे लागते. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात साडेसात अश्वशक्तीचे साडेसात हजार नवीन सौर कृषिपंप बसवण्यास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषिपंपांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत सौर कृषिपंप बसवण्यासाठी 'मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना' सुरु केली आहे. महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

 या योजनेतील पहिल्या टप्प्यात २५ हजार सौर कृषिपंप बसवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी ७५ हजार सौर कृषिपंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत साडेसात अश्वशक्तीचे साडेसात हजार सौर कृषिपंप बसवण्यास मंजुरी दिलेली आहे. 

महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे हे कृषिपंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ज्या गावांची सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपशाची स्थिती ६० मीटरपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येतील.

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/solar या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे. या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. 

अर्जासोबत ७/१२ उतारा प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी) आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने ए-१ फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे. ऑनलाइन फॉर्म प्राप्त झाल्यानंतर व सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल आणि त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

सौर कृषिपंप योजनेचे फायदे

  • सौर कृषिपंपामुळे दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता
  • दिवसा विनाव्यत्यय अखंडित वीजपुरवठा
  • वीज बिलापासून मुक्तता
  • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य व पर्यावरणपूरक परिचलन 

योजनेचा लाभ घेण्यास कोण पात्र

  • या योजनेसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च २०१८ पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये २.५ लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे)
  • ३१ मार्च २०१८ नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार
  • १ जानेवारी २०१९ पासून कृषीपंपासाठी सर्व नवीन अर्जदार
  • २.५ लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएसमधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छूक असलेला अर्जदार
  • ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी (मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने वीजजोडणी झालेली नसावी.)
  • याशिवाय विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी
  • महावितरण कंपनीकडे वीजजोडणीसाठी पैसे भरुनही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात वीजजोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी
  • तसेच अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहीर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील. (मात्र या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने यापूर्वी अटल सोलर योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा.)

कोणी किती भरणा करायचा आहे ?

या योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के व अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे. ७.५ अश्वशक्ती सौर कृषिपंपाची ८.९ टक्के जीएसटीसह किंमत ३ लाख ३४ हजार ५५० रूपये असून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा म्हणून ३३ हजार ४५५ रुपये केवळ तर अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा म्हणून १६ हजार ७२८ रुपये केवळ भरणा करावा लागेल.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या