पोलीस दलासाठी सातारा येथे साकारले ३० बेडचे कोविड हॉस्पिटल | Latest Marathi News



सातारा : सातारा येथे पोलीस कवायत मैदानावर पोलिसांसाठी राज्ययातील पहिले ३० बेडचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी सायंकाळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या संकटात आरोग्य यंत्रणा, प्रशासन यांच्यावर मोठा ताण असून पोलीस यंत्रणेचीही भूमिका महत्वाची असल्यामुळे त्यांच्यासाठी कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. येत्या सहा ते सात दिवसांत हे हॉस्पिटल कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपवनसरक्षक अधिकारी डॉ. भारतसिह हाडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. संग्राम देशमुख आदी उपस्थित होते. येत्या १५ तारखेपासून राज्य शासनाच्या वतीने 'माझं कुटुंब माझी सुरक्षा' ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. 

या हॉस्पिटलमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडाफार कमी होईल. तसेच पोलिसांनाही त्याचा लाभ होईल. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे ही संकल्पना पूर्णत्वास आली. या हॉस्पिटलसाठी दोन स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण भागातील कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामागची कारणे शोधण्याची गरज आहे. सातारा हे एक कुटुंब आहे. आपण सर्वजण मिळून या कोरोनाच्या संकटाचा सामना करू, असे रामराजे म्हणाले. पोलिसांनी स्वत:ला एकटं समजू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे. अशी ग्वाही त्यांनी दिली. 

या महामारीच्या काळात पोलीस कर्मचारी अविरत लढत आहेत. या कोवीड फायटर यांच्या आरोग्याचे स्वास्थही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी सातारा येथे उभारलेले कोवीड हॉस्पिटल उपयोगी ठरेल. आतापर्यंत पोलिसांनी चांगला लढा दिला आहे. तसाच लढा आणखी वर्षभर म्हटले तरी आमचे पोलीस देऊ शकतात. तथापि, जोपर्यंत कोव्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत आपल्याला लढावेच लागेल, असे उद्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी काढले. मी जागेची पाहणी करून गेल्यानंतर तीन दिवसांत हॉस्पिटल उभारण्याबाबत व्यवस्था करण्यास सांगितले होते. ही वेळ कमी होती. परंतु, जिल्हा पोलीस प्रमुखांनी तीन दिवसातच याचे पूर्ण नियोजन करत आपले नाव तेजस्वी असल्याचे सार्थ करून दाखवले, अशा शब्दात त्यांनी त्यांची प्रशंसा केली. प्रारंभी मान्यवरांनी हॉस्पिटलची पाहणी केली. स्वागत व प्रास्ताविक तेजस्वी सातपुते यांनी केले, तर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी आभार मानले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या