छायाचित्रांचा सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर होण्याचा धोका
गजानन चेणगे / ‘कपल चॅलेंज’च्या नावाखाली सध्या फेसबुकवर आपल्या जोडीदाराच्या समवेत काढलेल्या रोमँटिक छायाचित्रांचा नुस्ता ‘मुसळधार पाऊस’ सुरू आहे. जगभरातील ‘हौशी’ जोडपी यानिमित्ताने आपले खास फोटो सोशल करण्याची हौस भागवून घेत आहेत. परंतु आपण अपलोड करत असलेल्या छायाचित्रांचा सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर होण्याचा धोका असल्याचा इशारा सायबर क्राईम विभागाने दिला आहे.
हे चॅलेंज नक्की कुणी सुरू केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून हे चॅलेंज जगभर तुफान लोकप्रिय झाले आहे. अत्यंत कमी कालावधीत हे चॅलेंज सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्सपर्यंत झपाट्याने पोहोचले असून पाहता पाहता फेसबुकवर आपल्या जोडीदारासमवेतच्या रोमँटिक छायाचित्रांची लाटच आलेली पहायला मिळत आहे. त्यामध्ये हाय प्रोफाईल लोकांपासून सर्वसामान्य जनतेलाही या चॅलेंजचा मोह पडत असल्याचे पहायला मिळत आहे.
प्रत्येकाला आपली जोडीदार माधुरी, दीपिका, श्रध्दा वाटत असते. त्याचप्रमाणे तिलाही आपला हिरो म्हणजे सलमान, अक्षयकुमार, हृतिक असल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. वपुंच्या शब्दात सांगायचे तर, एखाद्याच्या घरी गेल्यावर संबंधित दांपत्य आपला अल्बम दाखवते. त्यामधील त्या दांपत्याच्या छायाचित्राला ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’ अशी उपमा देण्याची प्रथा आहे. अर्थात सौजन्याने तसे म्हणावे लागते. अन्यथा त्यातील ‘जोडा’ इतकाच शब्द खरा. तर अशा सर्व प्रकारच्या जोड्यांना या चॅलेंजमुळे एकत्र आणि तेही रोमँटिक पोझमधील छायाचित्र सोशल करण्याचे निमित्त सापडले आहे. परस्परांवरील प्रेम व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जात असावे.
याआधी ThenAndNow, 10YearsBack, 20YearsBack अशा चॅलेंजेसचे ट्रेंड आले होते. लोकांना जुन्या आठवणींमध्ये रमायला छान वाटते. माणसे त्यात हरवून जातात आणि अशा आठवणी छायाचित्रांच्या रूपाने वर्षानुवर्षे जतनही करून ठेवतात. त्याप्रमाणे त्यावेळी असंख्य नेटिझन्सनी आपली दहा - वीस वर्षापूर्वीची छायाचित्रे अपलोड करून जुन्या आठवणींना उजाळादेखील दिला होता.
तसेच Icebucketchallenge हेही असेच लोकप्रिय झाले होते. कडाक्याच्या थंडीत अंगावर बर्फ किंवा बर्फाइतके थंड पाणी घेतानाचे व्हीडीओ अनेकजण शेअर करत होते. काही दिवसांपूर्वी WeMetOnTwitter हॅशटॅगखाली आपल्या पहिल्या भेटीच्या मोरपंखी आठवणी शेअर करण्याचे चॅलेंजही अनेक जोडप्यांनी मोठ्या प्रमाणात एंजॉय केले होते. त्याप्रमाणेच आताच्या चॅलेंजलाही असंख्य जोडप्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत आहे.
मात्र कसलाही मागचापुढचा विचार न करता लोक मोठ्या प्रमाणात 'कपल चॅलेंज'च्या मोहात पडत असल्याने सायबर क्राईम विभागाने चिंता व्यक्त केली आहे. सायबर गुन्हेगार या छायाचित्रांचा गैरवापर करू शकतात. कदाचित यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते असा इशारा या विभागाने दिला आहे. यापूर्वीही सोशल मीडियावरील छायाचित्रांचा दुरूपयोग केल्याचे प्रकार घडलेले असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला नेटिझन्सना देण्यात आला आहे.
सिंगलकडून कपलची खिल्ली; नो चॅलेंज !
दरम्यान, कपल चॅलेंजला तुफान प्रतिसाद मिळत असल्यामुळे सिंगल असणाऱ्यांमध्ये डिवचले गेल्याची भावना तयार झाली आहे. त्यांनी कपल चॅलेंजची खिल्ली उडवणारी अनेक छायाचित्रे फेसबुकवर टाकली आहेत. काहींनी ‘सिंगल चॅलेंज’ हॅशटॅग करत आपल्या रूबाबदार पोझमधील छायाचित्रे अपलोड करून आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. तर काहींनी ‘नो चॅलेंज’, ‘स्माईल चॅलेंज’ हॅशटॅगखाली छायाचित्रे टाकून धमाल उडवून दिलेली पहायला मिळत आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या