लातूर : चार दिवसांपूर्वी ज्यांच्याविषयी ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती, त्या अहमदपूर (जि. लातूर) येथील लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (वय १०४) यांचे आज निधन झाले. महाराजांच्या निधनामुळे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकातील लाखो भक्तांमध्ये शोकाचे वातावरण आहे.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. नांदेड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खूपच खालावल्यामुळे काल (३१ ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्यामुळे हजारो भाविकांनी अहमदपूरला धाव घेतली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच प्रशासनावरही मोठा ताण आला होता.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरूंगवासही भोगला
अहमदपूरकर महाराज यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र वैद्यकीय व्यवसायात ते रमले नाहीत. वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासाठी त्यांनी दोनदा तुरुंगवासही भोगला होता.
महाराजांचे कार्य लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य आणि वंदनीय मूर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराजांप्रती शोकभावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या