गजानन चेणगे
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा व कराड या मोठ्या शहरांच्या मध्यभागी काशिळ हे गाव आहे. महामार्ग असल्याने यादरम्यान कोठेही अपघात झाल्यास जखमींना एकतर सातारला किंवा कराडला हलवावे लागते. जखमीला रूग्णालयापर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्यास वेळीच उपचार न मिळू शकल्याने कित्येकदा जखमीचा अनमोल जीव जातो. ही प्राणहानी टळावी या हेतूने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सातारा व कराडच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काशिळला हे ट्रॉमा केअर सेंटर अर्थात ग्रामीण रूग्णालय मंजूर केले होते. मात्र नंतरच्या फडणवीस सरकारच्या काळात हे काम रखडले.
पुढे महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून या रूग्णालयाच्या कामाला गती आली. पण सरकार स्थानापन्न झाल्यानंतर अल्पावधीतच कोरोनाची मोठी आपत्ती आल्यामुळे या रूग्णालयाची आत्यंतिक गरज जाणवू लागली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हे भव्य रूग्णालय बांधून, रंगरंगोटी करून तयार आहे. गेले काही दिवस त्या ठिकाणी ही कामे झपाट्याने सुरू असल्याचे दिसत आहे. नेते मंडळींकडून, प्रशासनाकडून हे रूग्णालय लवकरच सुरू होत असल्याचे सूतोवाचही वेळोवेळी झाले आहे. परंतु प्रत्यक्षात रूग्णालय सुरू होत नसल्यामुळे ते सुरू होणार तरी केव्हा असा प्रश्न लोकांना पडला आहे.
अलीकडे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण विक्रमी प्रमाणात वाढत असून त्यापुढे आरोग्य सेवा तोकडी पडू लागली आहे. गेले काही दिवस कोरोना बाधितांना बेड मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ येत आहे. बाधितांचे कुटुंबीय आपल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी बेड मिळावा म्हणून सर्वत्र धावाधाव करताना दिसत आहेत. नेते मंडळींना आर्जव करत आहेत. अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे प्रशासनाने छत्रपती शिवाजी संग्रहालयात जंबो कोविड सेंटर उभारायला घेतले आहे. आमदार शिवेंद्रराजे यांच्यासारखे नेते स्वत: अशी सुविधा उभी करायला पुढाकार घेत आहेत. अशा वेळी काशिळचे पूर्णत्वाच्या मार्गावर असलेले रूग्णालय नेमके कशात अडकले आहे असा सवाल केला जात आहे.
ऑक्सिजनयुक्त ५० बेडची व्यवस्था
काशिळच्या या रूग्णालयात ऑक्सिजनयुक्त ५० बेडची व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी पद निर्मिती व नियुक्ती झाल्याचेही वृत्त आहे. हे रूग्णालय लवकरात लवकर सुरू झाल्यास सातारा ते कराड पट्ट्यातील कोरोना बाधितांना मोठा दिलासा मिळणार असून अनेकांचे जीव वाचणार आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या