‘काळुबाई’च्या सेटवर कोरोनाचा घाला; आशालता व्हेंटिलेटरवर | Latest Marathi News


Marathi News... सातारा :
सोनी मराठी वाहिनीवरील 'आई माझी काळूबाई' मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवरील ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री व गायिका आशालता वाबगावकर यांच्यासह वीसहून कलाकार - तंत्रज्ञांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. आशालता यांना येथील खाजगी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे मालिकेचे सातारा जिल्ह्यात होत असलेले चित्रीकरण थांबवण्यात आले असून युनिटमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणावर प्रशासनाने निर्बंध घातले होते. परंतु मध्यंतरी काही नियम, अटी घालून चित्रीकरणास परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून पुन्हा नव्या दमाने 'लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन...' सुरू झाले होते. जिल्ह्यात विविध मालिकांच्या चित्रीकरणाला गती आली होती. यापैकीच 'आई माझी काळूबाई' ही प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल यांची मालिका असून गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात सातारा शहर, यवतेश्वर, वाई, मांढरदेव, आदर्की आदी ठिकाणी मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. मालिकेत जिल्ह्यातील व बाहेरील कलाकार काम करत आहेत.

या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान मागील आठ - दहा दिवसात वीसहून अधिक कलाकार - तंत्रज्ञांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचाही समावेश आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे. बाधा झालेल्यांपैकी काहीजण कोरोनातून बरे झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड याही या मालिकेत काम करत असून सध्या त्या मुंबईमध्ये चित्रीकरणात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या