सातारा : आजाराला कंटाळून व नैराश्यातून कोरोनाग्रस्त रूग्णाने रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की करत पळून जाऊन कृष्णा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील वाई येथे घडली. दरम्यान, घटनेवेळी गणपती घाटावर एका मालिकेचे चित्रीकरण सुरु असल्याने गर्दी होती. मात्र त्यांना कोणीही उडी मारण्यापासून रोखले नाही आणि नंतर पाण्यातून काढताना कोणी मदतही केली नाही.
पाचवड (ता वाई) येथील ६५ वर्षीय नागरिक चार दिवसांपूर्वी चाचणीमध्ये कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. शनिवारी रात्री त्यांनी मुलाला फोन करून, आपली प्रकृती उत्तम असून आपल्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. कोरोनामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा काढून फेकून दिली आणि आरोग्य सेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून ते रुग्णालयातून पळून गेले. डॉक्टर, आरोग्य सेविका तसेच कर्मचारी यांनी पीपीई किट घातलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मागे पळता येत नव्हते. पहाटे डॉ. विद्याधर घोटवडेकर यांना माहिती दिल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांनी रात्रगस्तीवरील पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून रुग्णालयात आणले. समजूत घालून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तसेच बँडेज पट्टीच्या साहाय्याने त्यांना खाटेला बांधून ठेवले होते. या प्रकाराची नातेवाईकांना कल्पना देण्यात आली.
कोरोना झाल्याचे त्यांना वाईट वाटत होते. घरी सोडण्याची मागणी ते करत होते. मात्र उपचार व इंजेक्शनचा डोस पूर्ण होईपर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दोन - तीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते. दरम्यान, रविवारी दुपारी त्यांनी पुन्हा कृत्रिम वायू यंत्रणा काढून टाकली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांनी त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी स्वत:च्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदीपात्रात उडी मारली. डॉ. घोटवडेकर व सहकारी कर्मचारी यांनी नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात आणले. परंतु नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या