पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पेवर्स टाकून मलमपट्टी करण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. प्रशासन कोरोनाच्या लढाईत गुंतले आहे. बरीचशी जनताही कोरोनानेच व्यापली आहे आणि रिलायन्सची यंत्रणा 'रस्ते मे सस्ते पेवर्सका मेल' करण्यात मश्गूल आहे. प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून कंपनीला लगाम घालावा, चुकीच्या कामाचा जाब विचारावा व कराराप्रमाणे दर्जेदार रस्ता व सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत टोल आकारण्यास प्रतिबंध करावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे दैन्य काही थांबायचे नाव घेत नाही. या महामार्गाची अवस्था पाहिली तर याला राष्ट्रीय महामार्ग का म्हणावे असा प्रश्न कोणालाही पडेल. महामार्गावरील खड्डे जीवघेणे ठरत असून लोकांचा दवाखान्याचा व वाहनांच्या देखभालीचा खर्च वारेमाप वाढला आहे. गेली काही वर्षे महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात अनेक आंदोलने होऊनदेखील रिलायन्सच्या कार्यपध्दतीत काडीचाही फरक पडलेला नाही. कुणाच्या आशीर्वादामुळे कंपनीची मुजोरी वाढली आहे असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
पुणे - बंगळुरू असा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. अलीकडे त्याला ग्वाल्हेर - बंगळुरू आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ असा दर्जाही मिळाला आहे. पण अवस्था पाहिली तर ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ अशी आहे. त्यातही प्रामुख्याने महामार्गाच्या शेंद्रे (सातारा) ते पुणे दरम्यानच्या महामार्गाची अवस्था पहिल्यापासूनच असाध्य रोग झाल्यासारखी आहे.
या टप्प्याच्या सहापदरीकरणाचे काम रिलायन्सकडे असून कराराप्रमाणे मुदतीत काम पूर्ण होऊन वाहनधारकांना दर्जेदार रस्ता मिळायला हवा होता, महामार्गावर ठिकठिकाणी पार्किंग झोन, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अपघात झाल्यास उपयोगी पडावी अशी क्रेन, रूग्णवाहिका आदी किमान सुविधा मिळायला हव्या होत्या. पण यापैकी कोणतीही सुविधा न देता वर्षानुवर्षे वारेमाप टोल वसूल केला जात आहे. वर्षा दोन वर्षांनी तो वाढवलाही जात आहे. त्याबद्दल जाब विचारणाऱ्यांना ठोकण्यासाठी गुंड पोसले जात आहेत. मागील काही वर्षात हे असे राडे असंख्य झाले आहेत. तरीही टोल व्यवस्थापनाची मनमानी अखंड सुरू आहे ती कोणाच्या वरदहस्तामुळे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
याच टप्प्यामध्ये शेकडो खड्डे पडल्याने, काम पूर्ण नसल्याने अनेक ठिकाणी डायव्हर्शन्स असल्याने सातारा ते पुणे प्रवास यातनामय होत आला आहे. अनेक अपघात घडले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली आहेत. तरीही खूप काही फरक पडलेला नाही. आजही महामार्गावर जागोजागी खड्डे आणि धुळीचे साम्राज्य कायम आहे. वेगात आलेली वाहने अशा खड्ड्यांमध्ये आपटून टायर फुटण्याचे प्रकार झाले आहेत. दुचाकीस्वारांचा जीव तर महामार्गावर खूपच स्वस्त झाला आहे.
खूपच वातावरण तापल्यावर यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पेवर्सचा वापर केला होता. त्यावर आंदोलकांनी आक्षेप घेले होते. खडी - डांबराच्या सहाय्याने खड्डे बुजवण्यात यावेत असे बजावण्यात आले होते. तरीही सध्या तोच प्रकार घडताना दिसत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पेवर्स टाकून मलमपट्टी करण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. प्रशासन कोरोनाच्या लढाईत गुंतले आहे. बरीचशी जनताही कोरोनानेच व्यापली आहे आणि रिलायन्सची यंत्रणा ‘रस्ते मे सस्ते पेवर्सका मेल’ करण्यात मश्गूल आहे. शासनाने याप्रकरणी लक्ष घालून कंपनीला लगाम घालावा, चुकीच्या कामाचा जाब विचारावा व कराराप्रमाणे दर्जेदार रस्ता व सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत टोल आकारण्यास प्रतिबंध करावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
- बसवेश्वर चेणगे
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


0 टिप्पण्या