सातारा : राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भातील अनलॉक मोहिमेअंतर्गत दिलेल्या सुधारित सुचनेनुसार आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निर्बंध हटविण्यात आले असून या प्रवासासाठी आता वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतु आंतरजिल्हा वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेस यांनी अंमलात आणावयाची मानक कार्यपध्दती शासनाने जाहीर केली असून खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोविड-१९ महामारीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सातारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.
या सूचनांचे पालन न केल्यास परवाना धारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम १९८८, केंद्रीय मोटार वाहन निरयम १९८९, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
खाजगी प्रवासी बससाठी नियमावली
लोकसेवा वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बस चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे.
बसेच आरक्षण कक्ष / कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये.
बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त ठेवण्यात यावे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारची कोविड-१९ आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
कंत्राटी बस सिटींग वाहनांमध्ये प्रवासी एक आड एक पध्दतीने आसनस्थ होतील अशाप्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल. स्लीपर बस वाहनांमध्ये डबल बर्थवर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल.
चालकाने प्रवासादरम्यान जेवण / अल्पोपहार / प्रसाधन गृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ती ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. त्यावेळी बसमध्ये चढताना व उतरताना प्रवासी शारीरिक अंतर पाळतील याची दक्षता घ्यावी.
प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देऊ नये, त्यांना कचरा कुंडीचा वापर करण्याच्या व बस स्वच्छ राखण्याच्या सूचना द्याव्यात.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या