कोठे आणि किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती आता अ‍ॅपवर शक्य ! | Latest Marathi News


सातारा :
जिल्ह्यात दररोज शेकड्याने कोरोना रूग्ण निघत असल्याने अनेकांना बेडसाठी वेटिंगवर रहावे लागत आहे. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची कुतरओढ होऊ नये म्हणून कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी एक अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रांताधिकारी यांनी कोरोना रुग्णांची तालुकानिहाय संख्या संबंधित तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींना रोजच्या रोज द्यावी, अशा सूचनाही पाटील यांनी बैठकीत केल्या.

इतर आजारांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात असलेल्या रुग्णांवर काही रुग्णांलयाकडून उपचार केले जात नाहीत, त्यांना उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी संग्रहालयात उभारण्यात येणारे कोविड रुग्णालय तीन आठवड्याच्या आत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी बैठकीत केले. 

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी निवृत्त डॉक्टरांची मदत घ्यावी. ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, अशा रुग्णांच्या घरात व्यवस्था होईल का याची पाहणी करुन त्यांना घरातच उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना द्यावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.

नियोजित जंबो कोव्हिड रुग्णालयात कोणकोणत्या सुविधा असणार आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली. बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार दीपक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी संग्रहालयात उभारण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या