दरवाजे बंद; व्यथा ऐकायला, निवेदन स्वीकारायलाही कोणी तयार नाही | Latest Marathi News


जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील लोक त्यांच्या अडीअडचणी, समस्या घेऊन न्याय मिळेल या आशेने जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. काही लोक, संघटना विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करत असतात. त्यावेळी प्रशासनाला देण्यासाठी त्यांनी निवेदनेही आणलेली असतात. पण त्यांच्या व्यथा ऐकायला, त्यांची निवेदने स्वीकारायलाही सध्या कोणी भेटत नाही. कारण कार्यालयाचे दरवाजेच बंद आहेत.

मुळात कोरोनाचे संकट आल्यापासून, म्हणजे साधारणत: मार्चच्या उत्तरार्धापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची जवळपास सर्वच आंदोलने थंडावली आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे एकत्र येऊन निदर्शने करावीत, घोषणाबाजी करावी अशी परिस्थिती नाही. कोणी उपोषण, धरणे आंदोलन करण्यासही धजावत नाही. त्यामुळे प्रशासनाचा बराच भार हलका झाला आहे. पोलीस यंत्रणेचाही त्या ठिकाणी बंदोबस्ताचा ताण कमी झाला आहे. अर्थात कोरोनापूर्वी प्रशासनाकडून आंदोलनांची फारशी दखल घेतली जात होती अशातला भाग नाही. पण आता तर कोरोनाचे सबळ निमित्तच सापडले आहे.

कोरोनाचे संकट असले तरी सर्वांच्याच जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे अपवादात्मक स्थितीत क्वचित आंदोलने होत आहेत. पण त्यावेळी निवेदन स्वीकारायला कोणी बाहेर येत नाही. आत जावून द्यायचे म्हटले तरी बाहेरच्या बाहेर बॉक्समध्ये टाकून जाण्याची सूचना व तशी व्यवस्था केलेली दिसते. कोरोनाच्या नावाखाली सगळे जिल्हाधिकारी कार्यालयच क्वारंटाईन झाल्यासारखा अनुभव लोकांना येत आहे. 

यात भर म्हणून की काय, परवा जिल्हाधिकारी कार्यालयातीलच सहा कर्मचारी बाधित निघाल्याने दरवाजेच बंद करण्यात आले आहेत. दरवाजावर तसे सूचनाफलक लावले आहेत. त्यावर अत्यावश्यक काम असेल तरच कार्यालयात येण्याची सूचना आहे. लोकांच्या दृष्टीने त्यांचे काम ‘अत्यावश्यक’च असते. पण अत्यावश्यकची प्रशासनाची व्याख्या त्यांच्या नजरेतून असते. त्यामुळे न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न लोकांना पडत आहे. कोरोनाच्या काळात न्यायाचे दरवाजे बंद आहेत.

- गजानन चेणगे


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या