सातारा : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली असल्यामुळे समाजावर मोठा अन्याय झाला आहे. अशावेळी राज्य सरकारने घेतलेला पोलीस भरतीचा निर्णय मराठा समाजासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठीचा निर्णय घ्यावा, मगच पोलीस भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तातडीने पोलीस भरती रद्द करावी, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय झाला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी अशी सकल मराठा समाजाची अपेक्षा असताना शासनाने मेगा पोलीस भरतीची तारीख जाहीर केली आहे. मराठा समाजातील असंख्य कुटुंबे आर्थिक दुर्बल आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. एकीकडे आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना शासनाने मेगा पोलीस भरतीचा निर्णय घेवून मराठा समाजातील तरुण, तरुणींवर मोठा अन्याय केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, देण्यात आलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे. मराठा समाजावर अन्याय होवू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पोलीस भरती घेवू नये. तातडीने भरती प्रक्रिया रद्द करावी. अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या