कोरोना रोखण्यासाठी मंगळवारपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम | Latest Marathi News


सातारा :
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जनतेच्या सहभागातून ही मोहीम सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत प्रभावीपणे राबविण्यात यावी, याविषयीचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जारी केले आहेत.

ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.

  • मोहिमेचे उद्दिष्ट : राज्यामध्ये गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार. अति जोखमीच्या व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड - १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण. सारी, आयएलआय रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण.
  • पथकाचे स्वरुप : पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि २ स्थानिक स्वयंसेवक (१ पुरुष व १ स्त्री) असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहेत. पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधण्यात यावे. सरपंच, नगरसेवक यांच्याकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्याऐवजी १ आरोग्य कर्मचारी, आशा देण्यात यावी. अशा वेळी पथकात २ आरोग्य कर्मचारी, आशा असतील. 
  • गृहभेटी पहिली फेरी : प्रत्येक घरात शिरण्यापुर्वी दाराबाहेर सोयीच्या ठिकाणी स्टीकर लावण्यात यावेत. घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सदस्याची अ‍ॅपमध्ये नोंद करण्यात यावी आणि त्यानंतर इन्फ्रारेड थर्मामीटरने तापमान व पल्स ऑक्सिमीटर ‘एसपीओ २’ मोजण्यात यावेत व ते नोंदविण्यात यावे. ताप असलेली व्यक्ती आढळल्यास तापमान (९६.६), अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा इत्यादी लक्षणे आहेत का याची माहिती घ्यावी. घरातील प्रत्येकास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजार आहेत का याबाबत विचारणा करावी आणि दिलेल्या उत्तरानुसार अ‍ॅपमध्ये माहिती भरण्यात येणार आहे.
  • माहिती भरल्यानंतर ताप १००.४ अंश फॅरनहाईट (३८) इतका किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा 'एसपीओ २' ९५ टक्के कमी असल्यास रुग्णांस जवळच्या हॉस्पिटलमध्ये संदर्भित करावे. संदर्भित करताना रुग्णास संदर्भ चिठ्ठी देण्यात यावी. तसेच कोविड-१९ प्रतिबंधाचे सर्व संदेश रुग्ण व घरातील सर्व नातेवाईकांना द्यावेत. घरातील कोणत्याही व्यक्तीस मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनी आजार, लठ्ठपणा, दमा किंवा इतर मोठे आजार असल्यास त्याची तपासणी करुन खात्री करावी. अशा रुग्णांचे तापमान ९७.७ (३७) पेक्षा जास्त असेल आणि १००.४ पेक्षा कमी असेल तरी सुद्धा उपचार केंद्रात संदर्भित करावे. 
  • गृह भेटी दुसरी फेरी : कुटुंबातील सदस्यांची माहिती पहिल्या फेरीत घेतलेली असल्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये दररोज ७५ - १०० घरे करावीत. या फेरीमध्ये सर्वांचे तापमान व एसपीओ २ मोजावे. दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला का याची खात्री करावी. पुन्हा एकवेळा आरोग्य संदेश द्यावा. ताप १००.४ फॅरनहरिट (३८) पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि हे ‘एसपीओ २’ ९४ टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णास संदर्भित करावे. पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असणाऱ्या घरातील व्यक्तीचा कोमॉर्बिड स्थितीसाठी चौकशी करावी.
  • मोहिमेदरम्यान द्यावयाचे संदेश : सतत मास्क घालून रहावे. दर २-३ तासांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या क्लिनिकमध्ये जावून तपासणी करुन घ्यावी. मधुमेह, हृदयविकार, किडीन आजार, लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान मोजावे व तापमान ९८.७ (३७) पेक्षा जास्त आढळल्यास क्लिनिकमध्ये तपासणी करावी. सध्या सुरु असलेल्या आजारामधील उपचार सुरु ठेवावेत. त्यास खंड पडू देवू नये, डॉक्टरांकडून नियमित तपासणी करुन घ्यावी. कोविडमुळे होणारी गुंतागुंत व मृत्यू टाळण्यासाठी ताप, खोकला, दम लागणे इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी केंद्रात जावून चाचणी करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करावेत.
  • १० व ७ दिवसाच्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी पुढील संदेश द्यावे : सतत मास्क लावावा. खोलीच्या, घराच्या बाहेर पडू नये. दर २ तासांनी स्वच्छ हात धुवावेत. स्वतंत्र टॉयलेट, बाथरुम, जेवणाची भांडी वापरावीत. कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. ताप आल्यास, थकवा जाणवू लागल्यास त्वरित रुग्णालयात जावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या