शिवसेनेचा ढाण्या वाघ आकाश जाधव यांचे निधन | Latest Marathi News


परळी भागाने लढवय्या सुपुत्र गमावला; शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Marathi News... सातारा : सज्जनगड - परळी खोऱ्यातील कट्टर शिवसैनिक, सातारा तालुकाप्रमुख आकाश नवनाथ जाधव (वय २७) यांचे गुरूवारी रात्री येथील खाजगी रूग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परळी खोऱ्याला मोठा धक्का बसला असून परळी भागावर शोककळा पसरली आहे. रात्री उशीरा संगममाहुली (सातारा) येथे कैलास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

आकाश जाधव यांना काविळ झाल्यामुळे येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. पण आजार बळावल्याने त्यांची झुंज व्यर्थ ठरली आणि गुरूवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांना मोठा धक्का बसला. शिवसेना परिवारासह परळी भागावर शोककळा पसरली. 

रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे, तालुका उपप्रमुख रमेश बोराटे, वाहतुक सेनेचे तालुकाप्रमुख सचिन जगताप यांच्यासह शिवसैनिक, उदयनराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आकाश जाधव हे मूळचे परळीचे. सध्या ते सातारा येथे मंगळवार पेठेत रहात होते. कट्टर, आक्रमक, लढवय्ये शिवसैनिक म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या रूपाने त्यांची दुसरी पिढी शिवसेनेत कार्यरत होती. त्यांचे वडील डॉ. नवनाथ जाधव शिवसेनेचे तालुका उपप्रमुख होते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने धाडसाने पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्याच पध्दतीने आकाश जाधव यांनीही पंचायत समिती निवडणूक अटीतटीने लढवली होती. अर्जुन खोतकर यांना त्यांनी प्रचाराला आणले होते. 

अंबवडे - परळी दरम्यान उरमोडी नदीवर पूल व्हावा यासाठी त्यांनी धरणे, रस्ता रोको, जलसमाधी यासारखी तीव्र आंदोलने छेडली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नदीवर पूल होऊन ५६ गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला होता. तसेच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी २५ - ३० ठिकाणी रक्तदान, नेत्र शिबिरांचे आयोजन केले होते. 

गाव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक हा संकल्प करून त्यांनी गावोगावी शाखा सुरू केल्या होत्या. ग्रामीण भागात त्यांचे मोठे काम व संपर्क होता. अलीकडे त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ ‘समर्थ सज्जनगड जीवनगौरव पुरस्कार’ सुरू करून पहिल्या पुरस्काराने शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांना सन्मानित केले होते. त्यांच्या व्यापक कार्यामुळे जनमानसात त्यांच्याविषयी विलक्षण आदर होता.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या