दुखापत झाल्याने कुस्तीला रामराम कराव्या लागलेल्या बापाची गोष्ट
Latest Marathi News : विपूल शहा / कुस्तीच्या आखाड्यात पायाला दुखापत झाल्यामुळे कुस्तीला रामराम कराव्या लागलेल्या मल्लाने आपल्या मुलाला पैलवान करण्याच्या इराद्याने त्याच्या पाचवीलाच लंगोट पूजन केल्याची मुलखावेगळी घटना कुस्तीची महान परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच घडली. शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गावच्या या घटनेची सध्या सर्वत्र कौतुकाने चर्चा सुरू आहे.
सोंडोली हे सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव. याच गावात राहणारा पैलवान संजय जाधव यांना पहिल्यापासून कुस्तीचा नाद होता. कोणताही कुस्तीचा वारसा नसताना फक्त आवड आणि कुस्तीमध्ये चमकायचे या हेतूने त्यांनी कुस्ती क्षेत्र निवडले.
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ते मुंबईत राजे शिवछत्रपती व्यायामशाळेत कुस्तीसाठी दाखल झाले. तेथे त्यांचे भाऊ कुस्ती संघटक पै. दत्ता जाधव यांचे त्यांना पाठबळ मिळाले.
त्यानंतर पंजाब येथे दोन वर्षे व त्यानंतर कोल्हापूर येथील शाहू कुस्ती केंद्रात त्यांनी सराव केला. या दरम्यान दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कुस्ती मैदानात कुस्त्या खेळल्या. ८४ किलो वजन गटातही महाराष्ट्र राज्याकडून कुस्ती खेळली. मात्र यश आले नाही.
कुस्ती बहरात असतानाच दुर्दैवी घटना
पै. संजय यांची कुस्ती पाहून अवतुर (ता. शाहूवाडी) येथील कुस्ती प्रेमी सरपंच अनिल पाटील व अरविंद पाटील यांनी आपली बहीण सरिता हिचा विवाह संजय यांच्याशी लावला. मात्र, कुस्ती बहरात असतानाच दुर्दैवी घटना घडली.
कोकरूड येथील कुस्ती मैदानात पायाला गंभीर दुखापत झाली आणि संजय यांना कुस्तीला रामराम करावा लागला. त्यांनी बांबवडे येथे व्यवसाय सुरू केला. पण आपणास यश जवळ आले असतानाही ते मिळाले नाही ही गोष्ट त्यांच्या मनात सलत होती.
आपले हे दु:ख पचवत आपला कुस्तीचा छंद आणि वारसा पुढे चालावा म्हणून आपणास मुलगा होवो अथवा मुलगी, तिला पैलवान करायचेच हे ध्येय पैलवान संजय जाधव यांनी ठेवले होते. आपल्या घरात एक पैलवान तयार करायचाच असे या दांपत्याने मुलाच्या जन्माअगोदरच ठरवले होते.
जन्मापासूनच लागली 'पैलवान' उपाधी
वास्तविक, आपल्या घरात पैलवान असावा असे पै. दत्ता जाधव व पै. संजय जाधव या दोघा भावांना वाटत होते. तथापि, पै. दत्ता यांची दोन्ही मुले मुंबईत वाढली. त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली नाही. मग या दोन्ही भावांनी संजय यांच्या मुलास पैलवान करायचे ठरवले.
१९ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरात मुलगा जन्माला आला. संपूर्ण घर आनंदित झाले आणि जन्मापासूनच मुलाला 'पैलवान' उपाधी लागली. पाळण्यात घालण्याअगोदरच मुलाच्या पाचवीला लंगोट पूजन करण्यात आले. ध्येयवेड्या आई व बापाने मुलाला पाळण्यात घालायच्या अगोदरच कुस्तीच्या आखाड्यात उतरवले.
पालकांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी
भुवया उंचावणाऱ्या सूज्ञ पालकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आपली पोरं घरातून बाहेर जातात, काय करतात, काय खातात, काय पितात याकडे लक्ष द्यायचे तर सोडाच, उलट त्यांचे नको ते हट्ट पुरविले जातात. मग पुढे जावून तीच पोरं आईबापाला मान खाली घालायला लावतात.
जोपासायचं काय, वाढवायचं काय, जर टिकवायचं असं वाटेल तेव्हा सर्वांनी पैलवान संजय जाधव डोळ्यासमोर धरावा. तरच आगामी काळात देशात बलदंड, सशक्त, निर्व्यसनी पिढी निर्माण होईल आणि आईबापांना पश्चातापाची वेळ येणार नाही.
- पै. राहुल जाधव, राज्य उपाध्यक्ष, कुस्ती मल्लविद्या महासंघ.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या